Maharashtra Politics : राज्यात महायुतीला (Mahayuti) घवघवीत यश मिळालं खरं, पण आता मुख्यमंत्री कोण? इथे महायुतीचं घोडं अडल्याचं पाहायला मिळत आहे. आधी शपथविधी 25 तारखेला होणार होता, पण आता सत्ता स्थापनेचा दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. अशातच आता एकनाथ शिंदेंनाच (Eknath Shinde) मुख्यमंत्री करा, असा सूर शिवसेनेतून (Shiv Sena) आळवला जात आहे, तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री व्हावेत म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी ठराव समंत केल्याची माहिती मिळत आहे. अशातच आता शिवसेनेकडून महाराष्ट्रात बिहार पॅटर्न (Bihar Pattern) राबवा आणि एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करा, अशी मागणी शिवसेनेकडून केली जात आहे.
"महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा"
महाराष्ट्रात बिहार, हरियाणा पॅटर्न राबवण्यात यावा मागणी शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात आली आहे. शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री केलं जाईल असा आम्हाला विश्वास आहे, असं म्हटलं आहे. जसं बिहारमध्ये भाजपच्या जागा जास्त असतानाही नितीश कुमार मुख्यमंत्री झाले, अगदी तसंच हरियाणात सैनीसाहेबांच्या नेतृत्वात निवडणूक लढली गेली आणि तेच मुख्यमंत्री झालेत. भाजप छोट्या पक्षांवर अन्याय करत नाही, असं मला वाटतं, सर्व योजना आणि शासन आपल्या दारी राबवण्यात शिंदेंची प्रमुख भूमिका होती. त्यामुळे एक कार्यकर्ता म्हणून शिंदेच मुख्यमंत्री होतील, असं मला वाटतं, असं नरेश म्हस्के म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केलं जावं, शिवसेना नेत्यांची बॅटिंग
शिवसेनेमधून मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच ठेवण्याचा सूर आळवला जात आहे. एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपदी कायम राहावं, अशी इच्छा व्यक्त करण्यात आली होती. निवडणूक शिंदेंच्या नेतृत्वाखाली लढवण्यात आल्याचं शिवसेनेकडून सांगितलं जात आहे. त्यामुळे शिवसेनेकडून शिंदेंनाच मुख्यमंत्री केलं जावं, यासाठी जोरदार बॅटिंग सुरू आहे. नरेश म्हस्के,संजय शिरसाट,भरत गोगावलेंनी एकनाथ शिंदेंनाच मुख्यमंत्री केलं जावं, यासाठी महायुतीच्या मित्रपक्षांना साद घातल्याचं पाहायला मिळत आहे.
बिहार वेगळा, महाराष्ट्र वेगळा : रावसाहेब दानवे
भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले की, "भाजप आज नाही, अनेक दिवसांपासून मित्र पक्ष असल्यापासून निवडणुका लढवत आहे. ज्यांच्यासोबत लढलो, त्यांच्यासोबत बसून निर्णय करावे लागतात. एकत्रित निवडणूक लढलो. विधीमंडळ पक्षाची नेते निवड होईल, भाजप देखील लवकर निवड करेल आणि त्यानंतर मित्र पक्षांसोबत बैठक होईल आणि नंतर मुख्यमंत्र्यांची निवड होईल. फडणवीस मुख्यमंत्री होणं हे कार्यकर्त्यांना वाटू शकतं, मला पण वाटतं भाजपचा मुख्यमंत्री व्हावा, ज्यांच्या सोबत लढलो त्यांना विचारुन सोबत घेऊन निर्णय होईल, बिहार वेगळं आहे आणि महाराष्ट्र वेगळा आहे, तिथे ठरवलेलं होतं की, कितीही आमदार आलेत तरी नितीश कुमार मुख्यमंत्री राहतील. मात्र महाराष्ट्र आम्ही कोणताही चेहरा ठेवलेला नाही, मी अमित भाईंच्या बैठकीत उपस्थित होतो. निवडणुकीनंतर पुढचा निर्णय होईल असं ठरलं होतं, कौल 2019 साली भाजप शिवसेनेला दिला, मात्र उद्धव ठाकरेंनी पर्याय खुले आहे असं बोलले, बाळासाहेबांना शिव्याशाप देणाऱ्यांसोबत जाऊन बसलेत, आम्ही सरकार चालवलं अनेक चांगले निर्णय झालेत, शेतकऱ्यांच्या फायद्याचे निर्णय झालेत, लाडकी बहिण योजना आणली, त्यांच्या जाहीरनाम्यात देखील तेच आलं, मी भाजपच्या प्रचाराचा प्रमुख होतो. आम्ही नागपूर संभाजीनगरला बैठक घेतली."