Hemant Dhome on Vinod Tawde : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी ठाण्यात भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप झाल्याने राजकीय खळबळ उडाली आहे. व्हिडिओमध्ये विनोद तावडे पैसे वाटताना दिसून आले आहेत. या घटनेनंतर राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांसह काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही हल्लाबोल केला आहे. दरम्यान, विनोद तावडे यांच्या प्रकरणावर मराठी अभिनेता आणि दिग्दर्शक हेमंत ढोमेनं सुद्धा खोचट शब्दात ट्विट करताना विचार करून मतदान करा, असे आवाहन केलं आहे. 


यांच्या ‘तावडे’ तून महाराष्ट्राला सोडवा! 


हेमंत ढोमेनं ट्विट करून म्हटलं आहे की, निवडणूक, लोकशाही हे सारं म्हणजे… ‘विनोद’ नाही गड्या! मंडळी उद्या विचार करून मतदान करा! यांच्या ‘तावडे’ तून महाराष्ट्राला सोडवा! #कोणाचा_गेम_कोणाला_फेम. या ट्विटमध्ये हेमंतनं #वसईविरार #vasaivirar #MaharahstraElection2024 टॅग दिले आहेत. 






दरम्यान, विनोद तावडेंचा व्हिडिओ समोर आल्यानंतर बहुजन विकास आघाडी (BVA) कार्यकर्ते दावा करत आहेत की भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे ठाण्यात पैसा वाटप करत होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या घटनेवर प्रश्न उपस्थित करत हा पैसा कुणाच्या तिजोरीतून आला? असा सवाल केला आहे.






पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं; सुषमा अंधारेचा फडणवीसांवर गंभीर आरोप


ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एबीपी माझाशी बोलताना विनोद तावडे आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी विरोधी पक्षातील नेत्यांच्या हेलिकॉप्टर्समधील बॅगा तपासल्या. मग विनोद तावडे यांची बॅग तपासण्यात आली नव्हती का?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला. सुषमा अंधारे यांनी ट्विट करत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. 'भाजपच्या नोट जिहादने तावडेंच्या आयुष्याचा भयंकर विनोद झाला, पुन्हा एकदा मराठा नेतृत्व संपवलं, देवेंद्रजी खुश तो बहुत होंगे आप?' असे सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. 






अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? अंजली दमानियांची सडकून टीका


अंजली दमानिया यांनीही विनोद तावडे प्रकरणावरून उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. दमानिया यांनी ट्विट करून जे खुर्चीसाठी एकमेकांचा गळा कापायला निघाले ते महाराष्ट्राच्या लोकांचे काय भलं करणार अशी विचारणा केली आहे. दमानिया यांनी ट्विट करून म्हटलं आहे की, जर विनोद तावडेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी ही बातमी leak केली असेल तर अतिशय शरमेची बाब आहे. अशी माणसं महाराष्ट्राचे राजकारण करणार? जे खुर्चीसाठी एकमेकांचा गळा कापायला निघाले ते महाराष्ट्राच्या लोकांचे काय भलं करणार, पैसे वाटणे, मतं विकत घेणे आणि आता हे? आणि काय काय पहावे लागणार आहे. किळस येतेय या घाणीची.