मुंबई : साताऱ्याच्या गादीबद्दल सगळ्यांना आदर आहे. या गादीची प्रतिष्ठा राखली नाही तर लोक काय भूमिका घेतात हे या निवडणुकीत स्पष्ट झालं आहे, असा टोला शरद पवारांनी भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना लगावला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उदयनराजेंनी राष्ट्रवादीची साथ सोडत खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे साताऱ्याच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक घेण्यात आली.
'मान गादीला, मत राष्ट्रवादीला' अशी घोषणा देत राष्ट्रवादी साताऱ्याच्या लोकसभा पोटनिवडणुकीत उतरली होती. राष्ट्रवादीच्या घोषणेला साद देत सातारकरांनी राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांच्या बाजूने कौल दिला. सातारच्या गादीबद्दल सगळ्यांना आदर असून या गादीची प्रतिष्ठा न ठेवणाऱ्यांचा पराभव सातारकरांनी केला आहे. श्रीनिवास पाटलांना विजयी केल्याबद्दल साताऱ्याला जाऊन तिथल्या जनतेचे आभार मानणार आहे, असं शरद पवारांनी सांगितले.
Satara Loksabha Bypoll | शरद पवार भिजले, उदयनराजे हरले!
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना 294462 मतं मिळाली. तर राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना 366721 मतं मिळाली. तर अभिजीत बिजुकले यांची पत्नी अलंकृता बिचुकले यांना केवळ 855 मतं मिळाली.
सत्ता येते जाते मात्र पाय जमीनीवर ठेवावे लागतात, भाजप-शिवसेनेला टोला
जनतेला सत्तेचा उन्माद पसंत पडलेला नाही. राजकरणात सत्ता येते जाते मात्र पाय जमीनीवर ठेवावे लागतात, अशी टीका शरद पवारांनी भाजप-शिवसेनेवर केली. सत्तांतर केलेल्या नेत्यांवर बोलताना शरद पवार म्हणाले की, काही अपवाद वगळता सत्तांतर केलेल्या नेत्यांना मतदारांनी नाकारलं आहे. जे पक्ष सोडून गेले, त्यांना अनुकूल निकाल नाही.
दिवाळी झाल्यानंतर सर्व आमदारांची बैठक होणार आहे. तसेच मित्रपक्षाबरोबरही बैठक घेणार आहे. यापुढे अधिक जोमाने पक्ष उभारणीसाठी काम करणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. तसेच विधानसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मेहनत घेतली, त्याबद्दल शरद पवारांनी सर्वांचे आभार मानले.
संबंधित बातम्या
- माझी चूक झाली उदयनराजेंना लोकसभेचं तिकीट दिलं, भर पावसात शरद पवार बरसले
- उदयनराजे दोन लाख मतांनी निवडणूक हरतील, तोंडी परीक्षेत पृथ्वीराज चव्हाणांचा दावा