मुंबई :महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष असलेल्या काँग्रेसनं विधानसभा निवडणुकीसाठी चौथी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसनं उमेदवार जाहीर करण्यामध्ये शंभरचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत १०२ जागांवर कांग्रेसने उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीतील विशेष बाब म्हणजे कुलाब्याची जागा अखेर काँग्रेसला गेली आहे. मुंबईतील आता बोरिवली आणि मुलुंड या दोनच जागा जाहीर होणे बाकी आहे.
सोलापूर शहर मध्य मधून अखेर काँग्रेसचा उमेदवार घोषित करण्यात आला आहे. शहराध्यक्ष चेतन नरोटे यांना काँग्रेसनं उमेदवारी देण्यात आली. या जागेवर महाविकास आघाडीतर्फे माकपचे नरसय्या आडम हे देखील इच्छुक होते.मात्र, आडम यांना महाविकास आघाडीने संधी न देता चेतन नरोटे यांना संधी दिली आहे. माकपला महाविकास आघाडीने धक्का दिला असल्याचं स्पष्ट झालं आहे. कोल्हापूर उत्तरमधील उमेदवार देखील काँग्रेसनं बदलला आहे.राजेश लाटकर यांच्या जागी मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
काँग्रेसनं तिसऱ्या यादीत कुणाला स्थान दिलं?
अकोला पश्चिम : साजिद खान मन्नन खान
कुलाबा : हीरा देवासी
सोलापूर शहर मध्य : चेतन नरोटे
कोल्हापूर उत्तर : मधुरिमाराजे छत्रपती यांना राजेश लाटकर यांच्या जागी उमेदवारी देण्यात आली.
अकोला पश्चिम काँग्रेसकडे, सोलापूर शहर मध्ये माकपला नाहीच
अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरेंच्या शिवसेनेनं जोर लावला होता. शिवसैनिकांनी देखील अकोला पश्चिम जागेसाठी आग्रह धरला होता. मात्र, काँग्रेसनं ही जागा मिळवण्यात यश मिळवलं. सोलापूर शहर मध्य मधून चेतनसिंह नरोटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. या ठिकाणी माकपचे नरसय्या आडम मास्तर इच्छुक होते. लोकसभेला त्यांनी काँग्रेसला पाठिंबा दिला होता. त्यामुळं त्यांना जागा सोडली जाईल अशी अपेक्षा होती. मात्र, या ठिकाणी काँग्रेसनं उमेदवार दिला आहे.
काँग्रेसनं शंभरचा टप्पा ओलांडला...
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसनं शंभर जागांचा टप्पा ओलांडला आहे. काँग्रेसनं आतापर्यंत 102 उमेदवार जाहीर केले आहेत. तर, ठाकरेंच्या शिवसेनेनं 85 उमेदवार जाहीर केले आहेत. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून 82 जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. मविआकडून समाजवादी पार्टीला 2 आणि माकपला कळवण आणि डहाणूची जागा दिली जाण्याची शक्यता आहे. म्हणजेच महाविकास आघाडीमधील 273 जागांवरील पेच सुटला आहे. मविआ शेकापला किती जागा सोडणार हे देखील पाहावं लागेल.
इतर बातम्या :