सातारा :  महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक येत्या काही दिवसांत जाहीर होणार आहे. सातारा जिल्ह्यात विधानसभेचे आठ मतदारसंघ आहेत. यापैकी पाटण विधानसभा मतदारसंघ महत्त्वाचा आहे. शिवसेना  नेते राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई पाटण मतदारसंघाचे आमदार आहेत. पाटण विधानसभा मतदरसंघातील लढत पारंपरिक विरोधकांमध्ये होते. पाटणकर आणि देसाई ही या तालुक्यातील प्रमुख राजकीय घराणी आहेत.पाटण तालुक्यातील राजकीय संघर्ष प्रामुख्यानं पाटणकर आणि देसाई यांच्यात राहिला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत देखील या दोन्ही घराण्यातील व्यक्ती पुन्हा एकदा आमने सामने येताना दिसणार आहेत.  महायुतीच्या जागा वाटपात सिटिंग गेटिंग सूत्रानुसार पाटणची जागा शिवसेनेकडे जाणार हे स्पष्ट आहे. तर, महाविकास आघाडीत निवडून येण्याच्या निकषाचा आधार घेतला गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला ही जागा सुटू शकते. या मतदारसंघावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा देखील दावा आहे. त्यामुळं या मतदारसंघाचं चित्र जागा वाटपाचा निर्णय झाल्यानंतर स्पष्ट होईल. मात्र, मतदारसंघातील मतदारांना शंभूराज देसाई विरुद्ध सत्यजीतसिंह पाटणकर अशी लढत होईल, अशी अपेक्षा आहे.


शंभूराज देसाई आणि सत्यजीतसिंह पाटणकर आमने सामने


पाटण विधानसभा मतदारसंघाची फेररचना झाल्यानंतर 2009 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विक्रमसिंह पाटणकर यांनी शंभूराज देसाई यांना पराभूत केलं होतं. त्यानंतर 2014 ची निवडणूक सर्व पक्षांनी स्वतंत्रपणे लढवली. यावेळी शंभूराज देसाई यांनी विक्रमसिंह पाटणकर यांचा पराभव केला. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत सत्यजीतसिंह पाटणकर यांनी शंभूराज देसाईंविरुद्ध निवडणूक लढवली. शंभूराज देसाई यांनी सत्यजीतसिंह पाटणकर यांना पराभूत करत विजय मिळवला. आतापर्यंत शंभूराज देसाई तीन टर्म आमदार झाले आहेत. 2004 च्या विधानसभा निवडणुकीत ते पहिल्यांदा आमदार झाले होते.


2019 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक बदल झाले. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं मविआ सरकार स्थापन केलं. मविआच्या सरकारमध्ये शंभूराज देसाई राज्यमंत्री होते. शिवसेनेत जून 2022 ला फूट पडल्यानंतरच्या एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये शंभूराज देसाई यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. या मतदारसंघातून शंभूराज देसाई यांना शिवसेनेची उमेदवारी दिली जाणार हे स्पष्ट आहे. दुसरीकडे पाटण मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हर्षद कदम हे देखील इच्छुक आहेत. याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस फुटल्यानंतर शरद पवार यांच्यासोबत राहणारे पाटणकर कुटुंबीय देखील तालुक्याच्या राजकारणात प्रभावी आहेत.  मविआच्या जागा वाटपाच्या चर्चेत निवडून येण्याचा निकष निश्चित केला गेल्यास ही जागा शरद पवार  यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाईल. या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे सत्यजीतसिंह पाटणकर विधानसभेचे उमेदवार असतील. 


2024 च्या लोकसभेवेळी काय घडलेलं?


पाटण विधानसभा मतदारसंघ हा लोकसभेला सातारा लोकसभा मतदारसंघात येतो. 2019 ची लोकसभा पोटनिवडणूक आणि 2024 ची लोकसभा निवडणूक या दोन्ही वेळेला इथं  शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आघाडी मिळाली आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या शशिकांत शिंदे यांना आघाडी मिळाली होती. तर, उदनयराजे भोसले हे या मतदारसंघात पिछाडीवर होते. उदयनराजे भोसले यांना पाटण विधानसभा मतदारसंघात 75460  मतं मिळाली. शशिकांत शिंदे यांना 78403 मतं मिळाली होती.


शंभूराज देसाई हॅटट्रिक करणार की पाटणकर दोन पराभवांचा वचपा काढणार?


शंभूराज देसाई यांनी 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. शंभूराज देसाई यावेळी विजयी झाल्यास ते हॅटट्रिक करतील. तर, सत्यजितसिंह पाटणकर हे 2014 आणि 2019 च्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यात यशस्वी ठरतात का हे पाहावं लागेल.


इतर बातम्या :


Karad South : कराड दक्षिणकडे संपूर्ण राज्याचं लक्ष, पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे हॅटट्रिकची संधी, भाजप अतुल भोसलेंना उतरवणार?