Marathwada Region Election Results 2024: राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार हे आता स्पष्टच झालं आहे . विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजप महायुतीने मोठी आघाडी घेतली आहे . तब्बल 200 हून अधिक जागा मिळवत महायुतीने राज्यासह मराठवाड्यातही जागांच गणित राखलं आहे . मराठवाड्याची राजधानी छत्रपती संभाजीनगरच्या निकालाकडे साऱ्या राज्याचे लक्ष आहे . बहुतांश ठिकाणी शिवसेना विरुद्ध शिवसेना असणाऱ्या लढतीत शिंदेंच्या शिवसेनेची सरशी झाल्याचे दिसत आहे . दरम्यान सिल्लोड विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या सुरेश बनकर या उमेदवाराचा पराभव करत शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार अब्दुल सत्तार विजयी ठरले आहेत .   


एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सिल्लोड विधानसभा मतदारसंघात अब्दुल सत्तार यांनी वर्चस्व निर्माण केलं आहे . सिल्लोड मतदारसंघातून तीन वेळा विजय मिळवत हॅट्रिक केल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला आहे . सिल्लोड मतदारसंघ हा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मतदारसंघ समजला जातो . शिवसेनेतील फुटीपासून महाविकास आघाडी कोसळणं आणि थेट शिवसेनेतील प्रबळ नेतृत्त्व असलेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) भाजपच्या मदतीनं मुख्यमंत्री पदी विराजमान होण्यापर्यंत अनेक हादरवणाऱ्या घटना महाराष्ट्रानं याची देही, याची डोळा अनुभवल्या. आता या सर्व धक्कादायक आणि अनाकलनीय घटनांनंतरची यंदाची पहिली विधानसभा निवडणूक पार पडत आहे. 


अब्दुल सत्तारांपुढे होते सिल्लोडचे आव्हान 


2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर अब्दुल सत्तार यांनी निवडणूक लढवली होती . त्यावेळीही त्यांच्या विरोधात भाजपने सुरेश बनकर यांना उमेदवारी दिली होती . 2019 चा विधानसभेत शिवसेनेच्या तिकिटावर अब्दुल सत्तार निवडणुकीच्या रिंगणात होते . त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून माणिकराव पलोडकर यांना उमेदवारी देण्यात आली होती . शिवसेना आणि नंतर राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर हा मतदार संघ सत्तारांसाठी आव्हानात्मक समजला जात होता . शिवसेनेच्या फुटीमुळे मत विभागण्याचं मोठं आव्हान सत्तार यांच्यासमोर होतं .


अब्दुल सत्तार यांच्या जंगम संपत्तीत वाढ


अब्दुल सत्तार यांची जंगम संपत्तीत वाढ झाली असून, स्थावर संपत्ती मात्र घट झाली आहे. 2019 मध्ये सत्तार यांच्याकडे  3 कोटी 69 लाख 93 हजार  941 जंगम संपत्ती आहे. आता 5 कोटी 43 हजार 651  रुपयांची जंगम मालमत्ता आहे. त्यामुळे 3 कोटी 64 लाख 50 हजार 290 रुपयांची जंगम मालमत्ता वाढली आहे. तर  2019  मध्ये सत्तार यांच्याकडे स्थावर संपत्ती 8 कोटी 39 लाख 96  हजार 891  रुपयांची होती. आता 1 कोटी 84 लाख 83 हजार 950 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यामुळे 6 कोटी 55 लाख 12 हजार 941 रुपयांची स्थावर संपत्ती घटली आहे.