Marathwada Region Election Results 2024: महाराष्ट्रातील २८८ जागांचा निकाल २३ नोव्हेंबरला स्पष्ट झाला. विजयाचा आकडा १५० पारही जाणार नाही असे अंदाज येत असताना मुसंडी मारत महायुतीने महाराष्ट्रात २०० चा आकडा पार करत २३५ जागांवर विजय मिळवला. जरांगे फॅक्टर, लाडकी बहीण, नात्यागोत्यांच्या लढती, जातीय समिकरणे अशा अनेक मुद्द्यावर गाजलेल्या या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी चारी मुंड्या चित झाल्याचे चित्र होते. मराठवाड्याच्या'बालेकिल्ल्या'तच ठाकरेंची शिवसेना भुईसपाट झाल्याचं चित्र आहे. पण याची कारणं काय? जाणून घेऊ..
छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुतीच ठरली 'लाडकी'
छत्रपती संभाजीनगरच्या ९ विधानसभा मतदारसंघात महायुतीच लाडकी ठरल्याचं चित्र आहे. औरंगाबाद पूर्वमध्ये इम्तियाज जलील यांचा निसटता पराभव करत भाजपच्या अतुल सावेंनी बाजी मारली. तर फुलंब्रीतही भाजपच्या अनुराधा चव्हाण यांनी विजयाची मोहर उमटवली. गंगापूरमधून भाजपकडून उभारलेले प्रशांत बंब विजयी ठरले. तर सिल्लोडमधून अब्दुल सत्तार, वैजापूरमध्ये शिंदेसेनेचे रमेश बोरनारे,पैठणमधून विलास भुमरे, औरंगाबाद पश्चिममधून संजय शिरसाट तर कन्नडमधून संजना जाधव हे शिंदे गटाचे उमेदवार विजयी झाले. ९ पैकी ३ ठिकाणी भाजप व ६ ठिकाणी शिंदेसेना असे चित्र छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे. त्यामुळे बालेकिल्ल्यातच ठाकरे गट भुईसपाट झाल्याचं दिसून आलं.
मराठवाड्यात ४० जागांवर महायुती
मराठवाड्यातील ४६ जागांपैकी ४० जागांवर महायुती लाडकी ठरली आहे. यात भाजपला २० जागा, शिंदे गटाला १३ तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला ८ जागा मिळाल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला एक, ठाकरे गटाला ३ व शरद पवार गटाला १ जागा मिळवण्यात यश आलं. लोकसभेत मराठवाड्यात दारुण पराभव झालेल्या महायुतीनं विधानसभेत मुसंडी मारली आहे.
मराठवाड्यात महाविकास आघाडीला यश का मिळालं नाही?
1. मराठा ध्रुवीकरण
मराठवाड्यात मनोज जरांगे यांचे निवडणुकीच्या तोंडावर आक्रमक झालेल्या स्वरुपामुळे महायुतीला जातीय मतांच्या समिकरणावर सांधले जाईल अशी अपेक्षा फेल ठरली. गेल्या अनेक महिन्यांपासून असलेली मराठा आरक्षणाची आणि जरांगे फॅक्टरची धार ऐन निवडणुकीत गोंधळलेली दिसली. मराठा मतांचे ध्रुवीकरण करण्यास महाविकास आघाडीला आलेलं अपयश हे मराठवाड्यात निवडुन न येण्यामागचं प्रमुख कारण समजलं जात आहे.
2. लाडकी बहीणचा प्रचार
महायुतीनं निवडणुकीच्या आधी आणलेल्या लाडकी बहीण योजनेचा केलेला प्रचार करत निवडणुकीच्या प्रचााराचा केंद्रबिंदू बनवला. महायुतीच्या लाडक्या बहिणीला खोडून काढण्यास महाविकास आघाडीला यश आले नाही. सोयाबीन, शेतकऱ्यांची नाराजी, तरुणाच्या रोजगाराचे प्रश्न ऐरणीवर आणत बटेंगे तो कटेंगे असले तरी त्याचा लाडक्या बहिणींच्या खाती १५०० रुपयांची रक्कम जमा होत असल्यानं हे मुद्दे बाजूला पडल्याचं चित्र होतं.
३. मुस्लिम मतांचं विभाजन
छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्यात जनतेनं काँग्रेसला नाकारल्याचंच चित्र आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये औरंगाबाद पूर्व मध्य आणि पश्चिम मतदारसंघाचे उदाहरण घेतल्यास मुस्लिम मतं आपल्याकडे वळवण्यास महायुती यशस्वी ठरली. औरंगाबाद पूर्वमध्ये मुस्लिमबहुल मतदार अधिक आहे. पण एमआयएमचे इम्तियाज जलील उमेदवार असणाऱ्या औरंगाबाद पूर्व मतदारसंघात महायुतीला मुस्लिम मतं आपल्याकडे खेचून आणण्यास यश मिळालं. या मतदारसंघातून भाजपचे अतुल सावे निवडून आले आहेत.