मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेच्या 288 जागांसाठी मतमोजणी सुरु आहे. सकाळी 11 वाजेपर्यंतच्या मतमोजणीनुसार महायुतीला जोरदार यश मिळताना पाहायला मिळत आहे. भाजपला 127, शिवसेनाला 55, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 35 जागांवर आघाडी मिळाली आहे. काँग्रेसला 20, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 16 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 13 जागांवर आघाडीवर आहे. भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी यासंदर्भात मोठं वक्तव्य केलं आहे. देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील, असं वक्तव्य दरेकर यांनी केलं.
देवेंद्र फडणवीस यांनी जे धर्मयुद्ध पुकारलं होतं त्यासाठी हम सब एक हैचा नारा जनतेनं मान्य केला. केंद्रात भाजपचं सरकार, महाराष्ट्रात भाजपचं सरकार आल्यास राज्याचा विकास होईल, यामुळं अधिक मतदान झालं, असं प्रविण दरेकर म्हणाले. आम्हाला विजयाची खात्री होती. महाराष्ट्राची जनता इतका आशीर्वाद देईल, असं वाटलं नव्हतं. लाडक्या बहिणींना सलाम करतो, त्यांच्यापुढं नतमस्तक होतो, असं दरेकर म्हणाले.
शिवसेना कुणाची खरी, कुणाची खोटी याबाबतचा निकाल जनतेनं दिला आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना खरी आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होईल. जी पार्टी मोठी आहे, त्यांचा मुख्यमंत्री होतो. भाजप 125 जागांजवळ गेली आहे, त्यामुळं भाजपचा मुख्यमंत्री होणार आहे. त्यामुळं देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, असं प्रविण दरेकर यांनी केलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नेत्या शितल म्हात्रे यांनी आमच्या अपेक्षेपेक्षा अधिक यश मिळताना दिसतंय. महायुतीचा मुख्यमंत्री होणार हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वात ही निवडणूक लढवली गेली आहे. शिवसेनेची पदाधिकारी म्हणून आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी व्हावं, असं शितल म्हात्रे यांनी म्हटलं.
भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी हा निकाल विकासाच्या भूमिकेवर आल्याचं म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात अटल सेतू,समृद्धी महामार्गाचं काम झालं. आता निकाल येत आहे. महायुतीचे नेते एकत्र बसतील. भाजपचे लोक एकत्र बसतील, सर्वजण एकत्र येत बैठक घेऊन निर्णय घेतील, असं केशव उपाध्ये म्हणाले.
महायुतीला जोरदार यश
लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर महायुतीनं डॅमेज कंट्रोल करत निवडणुकीच्या दिशेनं मोर्चेबांधणी केली. लाडकी बहीण योजना आणून राज्यातील महिलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न त्यांनी केला. या विधानसभा निवडणुकीत महायुतीला जोरदार यश मिळताना पाहायला मिळत आहे. महायुतीला 11 वाजेपर्यंत 222 जागांवर आघाडी मिळाली आहे.
इतर बातम्या :