मुंबई : माहीमच्या (Mahim) मैदानातला राजकीय संघर्ष आता तापलाय. एकीकडे भाजपनं अमित ठाकरेंना मदतीची भूमिका घेतलीय. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मात्र सरवणकर माघार घेणार नसल्याचे संकेत दिलेत. त्यामुळे या सामन्यात भाजप आणि शिवसेना दोन वेगळ्या ट्रॅकवर असल्याचं दिसतंय. अशा स्थितीत अमित ठाकरेंसमोरचं संकट वाढण्याची शक्यता आहे.
मुंबईतला माहीम यंदाच्या निवडणुकीतला हाय व्होल्टेज मतदारसंघ ठरला आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे पहिल्यांदाच रिंगणात उतरलेत. त्यांना मदत करण्याची भूमिका भाजपनं बोलून दाखवली आणि शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर यांच्यावर माघारीसाठी दबाव वाढला. पण सवरणकर निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. आता तर खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीच सरवणकरांच्या बाजूनं आपलं वजन टाकलंय...
माहीममध्ये आता तीन सेनेंमध्ये तिरंगी लढत
राज ठाकरेंनी चर्चा केली नसल्याचं सांगत कार्यकर्त्यांचा विचार करायला हवा असं स्पष्ट करून काय तो मेसेज दिलाय त्यामुळे सरवणकरांना बळ मिळालंय. त्यामुळे माहीममध्ये आता तीन सेनेंमध्ये तिरंगी लढत होणार हे निश्चित झालंय. मनसेकडून अमित ठाकरे, शिंदेंच्या शिवसेनेचे सदा सरवणकर आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे महेश सावंत यांच्यात सामना रंगणार आहे. दिवाळीचा मुहूर्त साधत अमित ठाकरेंना प्रचारालाही सुरुवात केलीय.
अमित ठाकरे माहीममधला हा चक्रव्यूह कसा भेदणार?
अमित ठाकरे लोकांपर्यंत पोहोचत असले तरी सर्वसामान्य लोकांचे उमेदवार आपणच असा दावा सरवणकर आणि महेश सावंत दोघांचाही आहे. सरवणकर निवडणूक लढवण्यावर ठाम असल्यानं आणि आता शिंदेंनेही माघार न घेण्याचे संकेत दिल्यानं राज ठाकरेंचं टेन्शन वाढणार आहे. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले अमित ठाकरे माहीममधला हा चक्रव्यूह कसा भेदणार हे पाहावं लागेल.
मनसेचा विधानसभा निवडणुकीत 'एकला चलो रे'चा नारा
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 चे (Maharashtra Assembly Elections 2024) बिगुल वाजले असून राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान पार पडणार आहे. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सामना रंगणार आहे. तर दुसरीकडे राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (MNS) विधानसभा निवडणुकीत 'एकला चलो रे'चा नारा दिला आहे.
हे ही वाचा :
एकनाथ शिंदे संकुचित मनाचा नेता, मनसेतून टीकेची पहिली तोफ धडाडली; माहीम विधानसभेचा वाद तापला