वाशिम: लोकसभेच्या वेळी राज्याचं लक्ष लागलेल्या वाशिम जिल्ह्यातील विधानसभेच्या लढतीही यावेळी रंगतदार होण्याची शक्यता आहे. वाशिम, रिसोड आणि कारंजा या तीन मतदारसंघांतील लढतीकडे यंदा सर्वांचं लक्ष लागलं आहे. त्यापैकी राखीव असलेल्या वाशिम मतदारसंघात भाजपकडून श्याम खोडे, ठाकरे गटाकडून डॉ. सिद्धार्थ देवळे आणि वंचितकडून मेघा डोंगरे या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 


वाशिम विधानसभा मतदारसंघ


हा मतदारसंघ तसा राखीव मतदारसंघ आहे. 1990 पासून तर 2004 पर्यंत इथं भाजप उमेदवार निवडून आला होता. 2004 ते 2009 पर्यंत हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यात गेला. मात्र 2009 पासून ते 2024 पर्यंत भाजपने पुन्हा बाजी मारली. रस्ते, पाणी, उद्योग शिक्षण बाबतीत कोणताच विकास गेल्या 15 वर्षात होऊ शकला नसल्याचं दिसतंय. मात्र विकसनशील लोकप्रतिनिधीसह सुशिक्षित उमेवदार पाहिजे अशी मागणी पक्ष आणि मतदारसंघातून होती.
  
2024च्या वाशिम विधानसभा  निवडणुकीच चित्र थोडं वेगळं आहे. महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाच्या शिवसेनेला ही जागा सुटली असून डॉ. सिद्धार्थ देवळे उमेदवार आहेत. तर महायुतीकडून तीन वेळचे आमदार असलेल्या लखन मलिक यांचा पत्ता कट करून श्याम खोडे हा नवीन चेहरा देण्यात आला. तर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मेघा डोंगरे यांना उमेदवारी दिल्याने या मतदारसंघात तिरंगी लढत पहावयास मिळणार आहे.


महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं पारडं जड


यामध्ये सर्वात जड पारडं जड समजलं जातं ते  महाविकास आघाडीचे उमेदवार सिद्धार्थ देवळे यांचं. कारण उच्चशिक्षित आणि वैद्यकीय व्यवसायात  त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांच्या तुलनेत भाजपचे उमेदवार हे फक्त 10 वी शिकलेले आहेत. त्यामुळे मतदारसंघाचा सर्वांगिन विकास करण्यासाठी तरुण आणि सुशिक्षित पिढीचा कल हा सुशिक्षित उमेदवाराकडे असल्याचं दिसतंय. 


भाजपमध्ये अंतर्गत नाराजी


मेहतर समाजाला प्रतिनिधित्व मिळावं म्हणून  विद्यमान आमदार लखन मलिक यांची जागी श्याम खोडे यांना उमेदवारी दिल्याने पक्षात नाराजी दिसतेय. श्याम खोडे यांचा जनसंपर्क कमी असल्याने त्यांच्यासाठी लढाई सोपी नाही. कारण दोन दिवसांपूर्वी झालेली योगी आदित्यनाथ यांच्या सभेला मिळालेला कमी प्रतिसाद ही  धोक्याची घंटा मानली जाते. 


वंचितच्या महिला उमेदवारी मेघा डोंगरे यांना मिळालेली उमेदवारी दोन्ही उमेदवारांना डोके दुःखी ठरणार आहे. प्रशासकीय नोकरीवर असलेल्या अधिकाऱ्यांची पत्नी म्हणून ओळख असणाऱ्या मेघा डोंगरेंची ओळख आणि वंचित बहुजन आघाडीचे पक्षात केलेलं काम पाहून बक्षीस स्वरूपात त्यांना उमेदवारी दिल्याची चर्चा आहे. 


आता 20 तारखेला होणाऱ्या निवडणुकीत नेमक जनता कोणत्या उमेदवारांना कौल देतात आणि कोण या मतदारांचं प्रतिनिधित्व करेल हे 23 तारखेच्या निकालानंतर कळेल.