नाशिक : शहरात आज शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची सभा होणार आहे. मात्र या सभेच्या दरम्यान होणाऱ्या पक्षप्रवेशाच्या आधी नाशिक पोलिसांनी (Nashik Police) ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या राजकीय पदाधिकाऱ्यांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. यामुळे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या निमित्ताने नाशिकमध्ये राजकीय वातावरण तापल्याचे चित्र आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 348 सराईत गुन्हेगारांना पोलिसांकडून हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. भाजपसह इतर पक्षातील पदाधिकाऱ्यांचा यात समावेश आहे. आज उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भाजप आणि वंचित बहुजन आघाडीतून ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या विक्रम नागरे आणि पवन पवार यांनाही हद्दपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. तर भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरेंचाही यात समावेश आहे. त्यातच काल नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार राहुल ढिकले आणि शरद पवार गटाचे उमेदवार गणेश गीते यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार बाचाबाची झाली होती. यानंतर पोलीस अक्शन मोडवर आल्याचे पाहायला मिळत आहे.
पोलीस दडपशाही करताय : सुधाकर बडगुजर
ठाकरे गटात प्रवेश करणाऱ्या नेत्यांवर हद्दपारीची नोटीस बजावण्यात आल्यानंतर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे उमेदवार सुधाकर बडगुजर यांनी गंभीर आरोप केलेत. त्यांनी म्हटलंय की, निवडणूक आयोगाच्या नियमावली प्रमाणे निवडणूक ही फेअर झाली पाहिजे. शासनाच्या माध्यमातून पोलीस प्रशासन दडपशाही करत आहे. प्रत्येक रॅलीमध्ये जर कोणी कार्यकर्ता दिसला तर त्याला तडीपारीची नोटीस बजावायची किंवा त्याला बोलावून समज द्यायची. त्याचे सीसीटीव्ही फुटेज आमच्याकडे आलेले आहेत. ते योग्य वेळी आम्ही बाहेर काढू. कार्यकर्त्यांना सांगितले जात आहे की, बडगुजरांच्या प्रचाराला जायचे नाही. पाच दिवस कुठेतरी निघून जा. नाहीतर तुला तडीपार केले जाईल, अशा धमक्या दिल्या जातात. भाजपचे काही माजी नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे समजले आणि त्यांना तडीपारीची नोटीस बजावली. मात्र, शिवसेना त्यांच्या पाठीशी आहे. भक्कमपणे त्यांना साथ देणार आहे. काळजी करण्याचे काहीही कारण नाही.
उद्धव ठाकरेंची तोफ धडाडणार
दरम्यान, विधानसभा निवडणुकीचा अंतिम टप्पा सुरू झाला असून नाशिकमध्ये बड्या नेत्यांच्या सभा या संपन्न होत आहे. ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज नाशिक येथे अनंत कान्हेरे मैदान या ठिकाणी सभा होणार आहेत. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार हे महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाचे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांची ही सभा ठाकरे यांच्या उमेदवारांसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी देखील महत्त्वाची मानली जात आहे. उद्धव ठाकरे नाशिकमध्ये सभेतून कोणावर तोफ डागणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
आणखी वाचा