Uddhav Thackeray on Tanaji Sawant : गेल्यावेळीच दिपक आबा साळुंखे पाटील यांना मी उमेदवारी देणार होतो पण, मध्येच धरण फोडणारा खेडका घुसला, असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांच्यावर टीका केली. त्याने सांगितलं साहेब माझं एका हा 100 टक्के निवडून येतो असे म्हणून शहाजीबापू पाटील यांना तिकीट द्यायला लावल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी दिपक आबांनी माझं ऐकल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. त्यांनी गद्दारी, लांडी लबाडी केली नाही, निष्ठेने लढले, आपल्याला असा सैनिक पाहिजे असेही उद्धव ठाकरे म्हणाले. सांगोला विधानसभेचे शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार दिपकआबा साळुंखे पाटील (Deepak Salunkhe) यांच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे बोलत होते. 


तुम्ही मन की बात करता आम्ही जन की बात करतो


भाजपने जाहीर केलंय की देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असणार. आता मिंदेंना म्हणावं बस भांडी घासत असे म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली. तुम्ही मन की बात करता आम्ही जन की बात करतो, ते खोक्याची बात करतात आम्ही जन की बात करतोय असे उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकास आघाडीचा इथे एकच उमेदवार आहेत. ते म्हणजे दिपक आबा साळुंखे पाटील असे उद्धव ठाकरे म्हणाले. या ठिकाणी एमआयडीसी नाही बंद पडली आहे. तुम्हाला रोजगार कुठे मिळणार? गुजरातला असेही उद्धव ठाकरे म्हणाले. आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार आहे. तसेच सुरतमध्येही छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. 


मुंबई अदानीच्या घशात घालण्याचं काम सुरु


महाराष्ट्रातील शेतकरी हमीभाव मागत आहेत, हे सांगतायेत राम मंदिर बांधलं, 370 कलम हटवलं असे म्हणत उद्धव ठाकरेंनी महायुतीवर टीका केली. या ठिकाणच्या मुलभूत प्रश्नावर ते काहीच बोलत नाहीत असे उद्धव ठाकरे म्हणाले. हे लोक मुंबई अदानीच्या घशात घालण्याचे काम करत असल्याची टीका ठाकरेंनी केली. यांचे सरकार जर परत आले तर तुमच्या सातबाऱ्यावर देखील अदानीचे मनाव आले तर काय करणार? असा सवाल उद्धव टाकरेंनी केला. अदानींच्या घशातून मुंबई काढून भुमिपुत्रांना तिथं परवडणाऱ्या दरात घरं उपलब्ध करुन देऊ असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपची निती ही वापरा आणि फेकून द्या अशी असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.