नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 ची (Maharashtra Assembly Elections 2024) रणधुमाळी सुरु झाल्यानंतर राजकीय घडामोडींना वेग आलाय. राज्यात महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) सामना रंगणार आहे. सर्वच पक्षांकडून उमेदवारांसाठी प्रचार केला जात आहे. आज राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) हे नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. कळवण-सुरगाणा विधानसभा मतदारसंघात (Kalwan-Surgana Assembly Constituency) माकपचे उमेदवार जे पी गावित (J P Gavit) यांच्या प्रचारासाठी आज शरद पवारांनी सभा घेतली. या सभेतून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (PM Narendra Modi) जोरदार हल्लाबोल केला. 


शरद पवार म्हणाले की, आजची सभा ऐतिहासिक सभा आहे. कानाकोपऱ्यातून सभेसाठी लोक आलेत. 6, 7 महिन्यांपूर्वी देशाची लोकसभा निवडणुक झाली. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, माकप यांनी एकत्र निवडणूक लढवली. देशाचे पंतप्रधान 400 जागा निवडून द्या, अशी मागणी जागोजागी करत होते. 50 टक्क्यांपेक्षा कमी खासदार संख्या असताना मनमोहन सिंग याचे सरकार टिकले होते. मोदी यांचे सरकार असताना 400 जागा कशासाठी? यांचा वेगळा डाव होता. बाबासाहेबांनी जे संविधान लिहिले त्यात बदल करण्यासाठी 400 खासदारांची मागणी ठिकठिकाणी करण्यात आली. आम्हाला शंका आली म्हणून आम्ही सर्व एकत्र आलो आणि आम्ही इंडिया आघाडी स्थापन केली. 


मोदी साहेबांना घटना बदलायची होती


बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या रचनेला धक्का लावण्याची शंका होती. सर्वांनी हा धोका ओळखला. नितीशकुमार आणि चंद्रबाबू नायडू यांनी साथ दिली आणि सरकार आले. ते सांगतात आम्हाला संविधान बदलायचे नव्हते, पण ते खोटे आहे. त्यांचे खासदार, नेते सांगत होते की मोदी साहेबांना घटना बदलायची होती. पण बाबासाहेबांची घटना जतन करण्याचे काम तुम्ही केले. लाडकी बहीण योजना आणली. या बहिणीला मदत करा. पण, तिच्या संरक्षणाची जबाबदारी घ्या. एका शाळेत लहान मुलीवर अत्याचार केले. 20 वर्ष ज्या मुलींचा शोध लागत नाही अशा मुलींची संख्या 680 आहेत. ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना भगिनींचे संरक्षण करता येत नाही, त्यामुळे भगिनींच्या संरक्षणासाठी आम्ही काम करणार आहोत. शेतकऱ्यांचा प्रश्न गंभीर होत आहे. या राज्यात, देशात जे जंगल वाचले ते आदिवासींमुळे वाचले आहे. जंगल राखण्याचे काम आदिवासी करत आहेत. हा आदिवासी कष्ट करणारा, शेती करणारा आहे, मग हा वनवासी शब्द आला कुठून? जे पी गावित यांनी व्यक्तिगत कामे कधी मांडले नाही, आदिवासी शेतकऱ्यांचे कामे सांगितले आहेत, असे शरद पवार यांनी म्हटले. 


शिवरायांचा पुतळा उभारण्याच्या कामात भ्रष्टाचार


आज हे राज्यकर्ते आणि त्यांच्या नेत्यांची गंमत वाटते. इथे शिवाजी महाराजांचा पुतळा उभारला. त्याच्या उद्घाटनाला मी आलो होतो. त्या पुतळ्याचे काम अजुनही सुरू आहे. शिवाजी महाराज दैवत आहे, युग पुरुष आहेत. या निवडणुकीनंतर प्रमुख लोकांनी बसावे आणि काम पूर्ण करावे. राज्यकर्त्यांना शिवाजी महाराजांची आस्था किती याबाबत शंका वाटते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिंधुदुर्गमध्ये पुतळा उभारला आणि तो कोसळला. मुंबईमध्ये  1960 साली पुतळा उभारला. पण, इतक्या वर्षात धक्का बसलेला नाही, अखंड वारं असतानाही धक्का बसला नाही. मोदींनी उभारलेल्या पुतळा आठ महिन्यात पडतो. पुतळा उभारण्याच्या कामात भ्रष्टाचार केला. त्यांना पुन्हा निवडून द्यायचे नाही. देशातील एक नंबरचे राज्य महाराष्ट्र आहे. तो लौकिक राज्यकर्त्यांनी घालवला आहे. महाराष्ट्र पुन्हा एक नंबर करण्यासाठी आम्ही काम करू, असेही शरद पवार यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


Ajit Pawar VIDEO : पवारसाहेब राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर हाच पठ्ठ्या कामं करणार, बाकी कुणाचा घास नाही : अजित पवार