नवी दिल्ली : भारतीय निवडणूक आयोगानं विधानसभा निवडणुकांची घोषणा करण्यासाठी पत्रकार परिषद घेणार असल्याचं जाहीर केल्यानंतर महाराष्ट्रात देखील तर्क वितर्क सुरु झाले होते. महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुका आज जाहीर होतील अशा चर्चा सुरु झाल्या होत्या, याबाबत काही माध्यमांनी देखील बातम्या दिल्या होत्या. मात्र, निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद सुरु झाल्यानंतर आज महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा केली जाणार नाही हे स्पष्ट झालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त राजीव कुमार यांनी त्यांच्या संबोधनात जम्मू काश्मीर आणि हरियाणा या दोन राज्यांबाबत माहिती दिली. यामुळं महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक आज जाहीर होणार नाही हे स्पष्ट झालं आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक जाहीर न करण्यामागील कारण सांगितलं.
महाराष्ट्राच्या प्रश्नावर मुख्य निवडणूक आयुक्त काय म्हणाले...
महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक आज जाहीर करण्यात आलेली नाही. महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यकाळ 26 नोव्हेंबरला संपत आहे, निवडणूक का जाहीर केली जात नाही, असं राजीव कुमार यांना विचारण्यात आलं. यावर त्यांनी असा प्रश्न विचारणं सोपं आहे, असं म्हटलं.
महाराष्ट्र आणि हरियाणाची निवडणूक सोबत झाली होती. हरियाणाची मुदत 3 नोव्हेंबर होती तर महाराष्ट्राची 26 नोव्हेंबर आहे. त्यावेळी जम्मू काश्मीरचा मुद्दा नव्हता. यावेळी पाच निवडणुकांचा मुद्दा आहे. महाराष्ट्र, हरियाणा, जम्मू काश्मीर, झारखंड आणि दिल्लीची निवडणूक आहे. सुरक्षा बलांचा मुद्दा आहे. महाराष्ट्रात पाऊस झाला होता त्यामुळं बीएलओची कामं झालेली नाहीत.अनेक सण आहेत, गणेशोत्सव,पितृपक्ष, नवरात्री, दिवाळी आहे. या सर्व गोष्टींचा विचार करुन दोन राज्यांच्या निवडणुका सोबत घेण्याचा निर्णय घेतला, असं राजीव कुमार म्हणाले.
हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक जाहीर
हरियाणा विधानसभेतील सदस्यसंख्या 90 इतकी आहे. हरियाणा विधानसभेचा कार्यकाळ 3 नोव्हेंबरला संपणार आहे. गेल्यावेळी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर भाजप आणि जेजेपीनं सत्ता स्थापन केली होती. हरियाणात एनडीएकडे 43 आणि इंडिया आघाडीकडे 42 आमदारांचं संख्याबळ आहे. जम्मू काश्मीरमध्ये दहा वर्षानंतर विधानसभा निवडणूक होणार आहे.
जम्मू काश्मीरमधील निवडणूक कार्यक्रम
जम्मू काश्मीर विधानसभेची निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे. पहिल्या टप्प्यात 24, दुसऱ्या टप्प्यात 26 आणि तिसऱ्या टप्प्यात 40 मतदारसंघात मतदान पार पडले. पहिल्या टप्प्यातील मतदान 18 सप्टेंबर, दुसऱ्या टप्प्यातील मतदान 29 सप्टेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान 1 ऑक्टोबरला होईल. तर जम्मू काश्मीर विधानसभेचा निकाल 4 ऑक्टोबरला जाहीर होईल.
हरियाणात एका टप्प्यात निवडणूक
हरियाणातील 90 जागांसाठी एका टप्प्यात मतदान पार पडेल. मतदान 1 ऑक्टोबरला होईल. तर, मतमोजणी 4 ऑक्टोबरला होणार आहे.
महाराष्ट्र आणि हरियाणा विधानसभा निवडणूक 2019 मध्ये सोबतच जाहीर झाली होती. मात्र, यावेळी हरियाणा आणि जम्मू काश्मीर या दोन्ही राज्यांची निवडणूक आज जाहीर होणार आहे. त्यामुळं आगामी काळात महाराष्ट्र आणि झारखंड राज्यातील विधानसभा निवडणूक सोबत जाहीर होऊ शकते.
संबंधित बातम्या :