यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात विधानसभेचे 7 मतदारसंघ आहेत. जिल्ह्यात यवतमाळ, राळेगाव, वणी, आर्णी,पुसद, दिग्रस आणि उमरखेड हे मतदारसंघ आहेत. पुसद विधानसभा मतदारसंघावर नाईक कुटुंबाचं वर्चस्व राहिलेलं आहे. महायुतीमध्ये ही जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यात आली आहे. तर, महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. अजित पवार यांनी विद्यमान आमदार इंद्रनील नाईक यांना संधी दिली आहे. तर, शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं शरद मेंद यांना उमेदवारी दिली आहे. या ठिकाणी ययाती नाईक यांचं नाव देखील चर्चेत होतं.
पुसदमध्ये दोन्ही राष्ट्रवादीमध्ये लढत
2019 च्या विधानसभा निवडणुकीत यवतमाळ जिल्ह्यातील 7 जागांपैकी 6 जागा महायुतीला मिळाल्या होत्या. भाजपनं 5 आणि शिवसेनेनं एका जागेवर विजय मिळवला होता. केवळ एका मतदारसंघात काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसला यश मिळालं होतं. पुसद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे इंद्रनील नाईक विजयी झाले होते. इंद्रनील नाईक यांनी 2019 ला भाजपच्या निलय नाईक यांचा पराभव केला होता. यावेळी मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर दोन्ही गट आमने सामने आले आहेत.
लोकसभेला पुसदमध्ये काय घडलं?
यवतमाळ जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघ तीन लोकसभा मतदारसंघात विभागले गेले आहेत. चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम आणि हिंगोली या लोकसभा मतदारसंघात सात विधानसभा मतदारसंघ विभागलेले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातील मतदारांनी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला पाठिंबा दिला होता. सात पैकी सहा मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आघाडी दिली होती. केवळ पुसद मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवारला आघाडी मिळाली होती. पुसद विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या राजश्री पाटील यांना आघाडी मिळाली होती. तर, संजय देशमुख या मतदारसंघात पिछाडीवर राहिले होते. राजश्री पाटील यांना 79984 मतं मिळाली होती. तर,संजय देशमुख यांना 76786 मतं मिळाली आहेत.
पुसदमध्ये यंदा कोण बाजी मारणार?
पुसद विधानसभा मतदारसंघात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत इंद्रनील नाईक यांनी लढत दिली होती. इंद्रनील नाईक यांना त्यावेळी 89143 मतं मिळाली होती. तर, निलय नाईक यांना 79442 मतं मिळाली होती. अपक्ष उमेदवार ज्ञानेश्वर बेळे यांना 11255 मतं मिळाली होती. यावेळी भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असल्यानं महायुतीकडून इंद्रनील नाईक रिंगणात आहेत. विरोधात शरद मेंद निवडणूक लढवत आहेत. पुसदचे मतदार कुणाला कौल देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
इतर बातम्या :