अहिल्यानगर : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातून भाजपनं प्रतिभा पाचपुते यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. मात्र, प्रतिभा पाचपपुते यांनी विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी देण्यासंदर्भात पक्षाकडे मागणी केली होती. मात्र, पक्षानं प्रतिभा पाचपुते यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं. उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दोन दिवस बाकी आहेत. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या उमेदवार प्रतिभा पाचपुते यांनी मोठा निर्णय जाहीर केला आहे. पक्षाकडे पुन्हा उमेदवार बदलण्याची मागणी करणार असून न ऐकल्यास सोमवारी अर्ज मागं घेणार असल्याचं त्यांनी म्हटलं.
प्रतिभा पाचपुते काय म्हणाल्या?
गेली पाच वर्ष पाचपुते साहेब आजारी असल्यानं मुंबईची कामं विक्रमसिंह पाहत होता. विक्रम कामं पाहायचा आणि साहेब आमदार म्हणून असायचे. तर, मला वाटतं तोच कामं पाहतो तर तोच आमदार का नाही? जर तो स्वत: आमदार असेल तर चागंलं काम करु शकेल, असं वाटतं. माझं तिकीट जाहीर झाल्यानंतर फडणवीस साहेबांना विक्रमला तिकीट द्या असं सांगायला गेले होते. मात्र, त्यांनी सांगितलं की आता फिक्स झालंय तुम्हीच उभं राहा. मुंबईहून आल्यावर मी प्रचाराला सुरुवात केली.प्रचाराला सुरुवात केल्यानंतर बाहेर राहावं लागायचं. त्यामुळं कळत नकळत पाचपुते साहेबांकडे दुर्लक्ष व्हायला लागलं. आमच्याकडे केअरटेकर आहे, पण त्याच्याकडून साहेबांचं एकदा दोनदा औषध चुकलं होतं. त्यामुळं माझं पत्नी म्हणून कर्तव्य आहे की पहिलं साहेबांची तब्येत आणि नंतर आमदारकी, असं प्रतिभा पाचपुते म्हणाल्या. 1984 पासून बबनराव पाचपुते यांची पत्नी आहे. तेव्हापासून साहेब सलग आमदार आहेत, मी तेव्हापासून आमदारांची पत्नी आहे. आता आमदाराची आई व्हायला काय हरकत आहे, असं प्रतिभा पाचपुते म्हणाल्या.
कार्यकर्त्यांना पाचपुते कुटुंबातील उमेदवार हवाय
प्रतिभा पाचपुते पुढं म्हणाल्या, कार्यकर्त्यांना पाचपुते कुटुंबातील माणूस हवा आहे. आमचे कार्यकर्ते चिवट कार्यकर्ते आहेत. पाचपुते साहेब सात वेळा सात चिन्हावर निवडून आले आहेत. कार्यकर्त्यांना पक्ष माहिती नाही की चिन्ह माहिती नाही फक्त पाचपुते साहेब हवे आहेत. बॅलेट पेपरवर माझ्या नावापाठीमागं पाचपुते साहेबांचं नाव असेल किंवा विक्रमच्या नावापुढं देखील पाचपुते साहेबांचं नाव हवं आहे, असं प्रतिभा पाचपुते म्हणाले.
पक्षानं ऐकलं नाही तर...
विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी यासाठी भाजप उमेदवार प्रतिभा पाचपुतेही आग्रही आहेत. प्रतिभा पाचपुते पक्षाकडे पुन्हा उमेदवार बदलण्याची मागणी करणार आहेत. पक्षानं न ऐकल्यास सोमवारी स्वतःचा अर्ज मागे घेणार आहेत. बबनराव पाचपुते यांच्या तब्येतीचे कारण देत प्रतिभा पाचपुते माघार घेणार आहेत.
इतर बातम्या :