नाशिक : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या (Maharashtra Assembly Election 2024) प्रचाराच्या तोफा आज थंडावणार असल्याने राजकीय घडामोडींना वेग आलाय. त्यातच आता नाशिकमधून (Nashik News) एक मोठी बातमी समोर येत आहे. एका नामांकित हॉटेलमध्ये कोट्यवधी रुपये सापडले असून यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचारचा आज अखेरचा दिवस असल्याने निवडणूक आयोगाचे पथक अधिक सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. शनिवारी मुंबईत 80 कोटींची चांदी जप्त करण्यात आली होती. या पाठोपाठ नागपूर आणि जळगावात कोट्यवधी रुपये किंमतीचे सोने आणि चांदी जप्त करण्यात आले. नागपुरात जप्त केलेल्या सोन्या चांदीची किंमत 14 कोटी तर जळगावात जप्त केलेल्या सोने, चांदीची किंमत पाच कोटी 59 लाख 61 रुपये आहे.
नाशिकमध्ये आढळलं मोठं घबाड
आता या पाठोपाठ नाशिकमध्ये मोठं घबाड सापडलं आहे. नाशिकच्या एका नामांकित हॉटेलमध्ये निवडणूक आयोगाच्या पथकाने छापा टाकला. या छाप्यात कोट्यवधीची रक्कम जप्त करण्यात आली आहे. पाच कोटीहून अधिक रक्कम असल्याची माहिती मिळत असून या कारवाईत एका राजकीय पक्षाच्या नेत्याची गाडी जप्त करण्यात आली आहे. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशी इतकी मोठी रक्कम आढळल्याने नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, ही कोट्यवधींची रक्कम सत्ताधारी पक्षाची असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळत आहे. आता यावर काय कारवाई होणार आणि ही रक्कम नेमकी कोणाची आहे? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महायुतीच्या उमेदवाराची प्रचाराची रिक्षा फोडली
दरम्यान, धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघातील (Dhule Rural Assembly Constituency) भारतीय जनता-पक्षाचे उमेदवार राम भदाणे यांच्या प्रचारार्थ रीतसर परवाना घेऊन लावलेल्या रिक्षाची समोरील काच फोडण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. एवढेच नव्हे तर रिक्षावर लावलेले उमेदवार राम भदाणे यांचे बॅनर फाडून रिक्षाच्या डिझेलच्या टाकीत चहा पावडर आणि साखर देखील टाकण्यात आली. या खोडसाळपणाचा तालुकाभरातून निषेध करण्यात येत आहे. रिक्षाचालकाने घडलेल्या प्रकाराची मोहाडी पोलिसांना माहिती दिली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या