Maharashtra Assembly Election 2024 : आगामी विधानसभा निवडनुकीच्या (Maharashtra Vidhan Sabha Election 2024) अनुषंगाने राज्याच्या राजकारणात बंडखोरीला उत आला आहे. दरम्यान, महायुतीसाठी एक बंडखोरी मोठी डोकेदुखी ठरत आहे. अनेक ठिकाणी महायुतीत बंडखोरी असली तरी बुलढाण्यात (Buldhana) मात्र सर्वात मोठी बंडखोरी आपल्याला बघायला मिळत आहे. बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिंदेच्या शिवसेनेचे संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांच्याविरुद्ध आता भारतीय जनता पक्षाचे माजी आ. विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून संजय गायकवाड यांना आव्हान दिला आहे.


नरेंद्र मोदी यांना शिवसेनेच्या उमेदवाराने अपमानीत केलंय- विजयराज शिंदे


भाजपाचे नेते विजयराज शिंदे यांनी उमेदवारी अर्ज भरल्यानंतर आपण का बंडखोरी करतोय याची धक्कादायक कारणेही त्यानी सांगितली आहेत. यावेळी ते म्हणाले की, मी बंडखोरी केली नाही. मी पक्षाकडे मैत्रीपूर्ण लढतीसाठी परवानगी मागितली आहे. मला आशा आहे की आमचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे मला लवकर परवानगी देतीलच. शिवसेनेच्या उमेदवाराने गेल्या पाच वर्षात आमच्या भाजपाच्या गाव पातळीपासून देशपातळीवरील नेत्यांना अपमानित केलं आहे. आमचे ऋषितुल्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिवसेनेच्या या उमेदवाराने शिवी देत अपमानीत या शिंदे गटाच्या उमेदवाराने केलंय.


देवेंद्र फडणवीस यांना कोरोना काळात " मला जर कोरोनाचे जंतू सापडले तर मी त्यांच्या तोंडात कोंबेन, अस म्हणून अवमानित केलं. आमचे आमदार संजय कुटे याना आईवरून शिवीगाळ करून अवमानित केलं. आमचे दिवंगत नेते भाऊसाहेब फुंडकर याना अपमानित केलं. माझ्यासह अनेकांवर जीवघेणे हल्ले या शिंदे गटाच्या उमेदवाराने केले. या सर्व कारणाने मी त्याच्या विरुद्ध लढून या मतदार संघातील भाजपची ताकद दाखविणार आहे. असे म्हणत भाजपचे माजी आमदार विजयराज शिंदे यांनी शड्डू ठोकला आहे.   


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चर्चेचं निमंत्रण


भाजपाला सातत्याने अवमानित करणाऱ्या शिंदे गटाच्या उमेदवाराला आम्ही ताकद दाखवू. तसेच आमच्या भाजप पक्षाला, भाजप मतदारांना, कार्यकर्त्यांना सन्मानित करणार आहे. असेही ते म्हणाले. मात्र संपूर्ण संवादात विजयराज शिंदे यांनी शिंदे गटाचे उमेदवार असलेले आमदार संजय गायकवाड यांचं नाव घ्यायचं ही टाळलंय, हे विशेष. दरम्यान, बुलढाणा विधानसभा मतदारसंघात महायुतीचे अधिकृत उमेदवार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध बंडखोरी करणाऱ्या भाजपाचे माजी आमदार विजयराज शिंदे याना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून चर्चेचं निमंत्रण आले आहे. अशी माहिती स्वत: विजयराज शिंदे यांनी दिली आहे. त्यामुळे आता भाजपाचे माजी आमदार विजयराज शिंदे नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 


हे ही वाचा