Jayant Patil on BJP : बटेंगे तो कटेंगे (Batenge Toh Katenge) ही 18 ते 19 व्या शतकातली भाषा आहे. आपण आता 21 व्या शतकात आहोत. लोक आता फार पुढे गेले आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भाजपवर टीका केली. बटेंगे तो कटेंगेच्या मुद्यावरुन जयंत पाटलांनी टीका केली. बटेंगे तो कटेंगे आता येणं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्रात 50 पेक्षा जास्त जागा येणार नाहीत असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.
महाराष्ट्रातील बेरोजगारीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार
महाराष्ट्रातील बेरोजगारीला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री जबाबदार असल्याचे जयंत पाटील म्हणाले. जीएसटी मुळे जनता हैराण झाली आहे. देशात काहीच मोकळे ठेवले नाही. महाराष्ट्र चुकीच्या लोकांच्या हातात गेला आहे असे जयंत पाटील म्हणाले. ते आष्टी - पाटोदा -शिरूर कासार विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मेहबूब शेख यांच्या प्रचारासाठी जयंत पाटील बीड जिल्ह्यात आले होते. यावेली त्यांनी महायुतीवर टीका केली. आमचा उमेदवार गरीब आहे, शून्यातून पुढे आला असल्याचे जयंत पाटील म्हणाले.
आष्टी मतदारसंघात चौरंगी लढत
आष्टी मतदारसंघात महायुतीचे दोन उमेदवार रिंगणात आहेत. येथे महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची उमेदवारी मेहबूब शेख यांना देण्यात आली आहे. तर, महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून सुरेश यांची उमेदवारी जाहीर झाली आहे. मात्र, विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांनीही अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शड्डू ठोकला आहे. तर भाजपमधूनच बाहेर पडलेले भीमराव धोंडे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. त्यामुळं या मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात कोण विजयी होणार, याची चर्चा जिल्ह्यासह राज्यात आहे. त्यातच, मनोज जरांगेंनी घेतलेल्या भूमिकेचा नेमका फायदा कोणाला होणार, आष्टीकर कोणाला पाडणार हेही लवकरच स्पष्ट होईल.
2019 मध्ये भीमराव धोंडेंचा पराभव
आष्टी विधानसभा मतदारसंघात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळासाहेब आजबे हे विद्यमान आमदार आहेत. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी 25 हजार 825 मतांनी विजय मिळवला होता. आष्टीमधून त्यांनी भाजपच्या भीमराव धोंडा यांचा पराभव केला होता. सध्या भीमराव धोंडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर, भाजप महायुतीकडून सुरेश धस यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, येथील मतदारसंघात चौरंगी लढत होत आहे.
महत्वाच्या बातम्या: