Praniti Shinde : महाविकास आघाडीकडून पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात काँग्रेसने भगीरथ भालके यांची उमेदवारी पहिल्यांदा जाहीर केली होती. त्यामुळं तेच महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असल्याचा टोला सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी लगावला. तुम्ही बाकीच्यांचा विचार करु नका ते गिनती मे भी नही है असे म्हणत प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवाराची खिल्ली उडवली.


काल याच ठिकाणी माढ्याचे शरद पवार गटाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी भगीरथ भालके यांना गद्दार संबोधत जनता त्यांना 20 तारखेला धडा शिकवेल असा टोला लगावला होता. त्यावर आज प्रणिती शिंदे यांनी मोहिते पाटलांच्या टीकेला चोख शब्दात उत्तर दिले. आज प्रणिती शिंदे यांच्या हस्ते महाविकास आघाडीतील राष्ट्रीय काँग्रेसचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या प्रचाराचा शुभारंभ माचनूर येथे पार पडला. यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन करीत भगीरथ भालके यांनी आपली ताकद दाखवून दिली. 


आपली लढाई ही भाजपसोबत असून बाकीचे आपल्या गणतीत नाहीत


या प्रचार सभेत खासदार प्रणिती शिंदे यांनी मी खासदार झाल्यानंतर जे पहिले काम केले ते पंढरपूरची उमेदवारी काँग्रेसकडे खेचून आणली. आता दुसरे काम 20 तारखेला तुम्हाला करायचे आहे असे सांगत भगीरथ भालके यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. आपली लढाई ही भाजपसोबत असून बाकीचे आपल्या गणतीत देखील नाहीत असे सांगत शरद पवार गटाच्या उमेदवाराची त्यांनी खिल्ली उडवली.


लोकसभेला मला मिळालेल्या 45 हजार मताधिक्यापेक्षा जास्त मताधिक्य भगीरथ भालके यांना द्या 


यावेळी प्रणिती शिंदे यांनी भाजपवर सडकून टीका केली. आम्हाला तुमची लाडकी बहीण नको तुमचे पैसे नको आम्हाला आमचा स्वाभिमान सुरक्षा द्या असा टोला त्यांनी लगावला. आपल्या भाषणात प्रणिती शिंदे यांनी नरेंद्र मोदी व राज्य सरकारवर सडकून टीका करत लोकसभेला मला मिळालेल्या 45 हजार मताधिक्यापेक्षा जास्त मताधिक्य भगीरथ भालके यांना द्या असे आवाहन केले. मी पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात रात्रंदिवस प्रचार करून तुमच्यासोबत असेल तुम्हीही भगीरथ भालके यांना विजयी करत महाविकास आघाडीचा एक आमदार पाठवा असे आवाहन त्यांनी केले. 


दरम्यान, पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघात तिरंगी लढत होत आहे. याठिकाणी महायुतीकडून पुन्हा समाधान आवताडे यांना संधी देण्यात आली आहे. तर या ठिकाणी महाविकास आघाडीच बिघाडी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.