जालना : राज्यात सध्या विधानसभा निवडणुकीची (Vidhan Sabha Election 2024) धूम आहे. इच्छुक नेते उमेदवारी अर्ज भरत आहेत. मराठवाड्याच्या जागांकडे यावेळी संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असणार आहे. कारण मराठवाड्यातच ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण आंदोलनाची बिजं रुजली आहेत. दरम्यान, मराठवाड्यातील जालना जिल्ह्यातील बदनापूर या जागेवर नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या जागेवर महायुतीचा उमेदवार विजयी होणार की महाविकास आघाडी बाजी मारणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


2019 साली जिल्ह्यावर भाजपाचे वर्चस्व


जालना जिल्ह्यात शिंदे गटाचे अर्जुन खोतकर, भाजपाचे रावसाहेब दानवे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राजेश टोपे आदी महत्त्वाचे नेते आहेत. या तिन्ही नेत्यांनी मंत्रिपद भूषवलेलं आहे. त्यामुळेच जालना जिल्हा हा महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक अर्थांनी महत्त्वाचा आहे. 2019 साली जिल्ह्यातील 5 पैकी 3 विधानसभेवर भाजप चे वर्चस्व राहिले. माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या नेतृत्वात भाजपचाच या मतदारसंघावर वरचस्मा राहिला. दरम्यान, यावेळी बदनापूर या मतदारसंघात काय होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. 


नारायण कुचे आणि प्रेमकुमार चौधरी यांच्यात लढत


बदनापूर या मतदारसंघातून तिकीट मिळावे यासाठी अनेक नेत्यांनी जोरदार फिल्डिंग लावली होती. विद्यमान आमदार नारायण कुचे या मतदारसंघातून सलग दोन वेळा भारतीय जनता पार्टीच्या तिकीटावर निवडून आलेले आहेत. महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार यांच्या वाट्याला आली आहे. त्यामुळे या जागेवरून शरद पवार यांच्या पक्षाकडून बबलू उर्फ प्रेमकुमार चौधरी यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. महायुतीमध्ये ही जागा भाजपाला सुटली आहे. त्यामुळे भाजपाने या जागेवर नारायण कुचे यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे येथे नारायण कुचे आणि प्रेमकुमार उर्फ बबलू चौधरी यांच्यात लढत होणार आहे.


2019 साली नेमकं काय घडलं होतं? 


2019 साली या जागेवर भाजपाने नारायण कुचे यांना तिकीट दिले होते. तर राष्ट्रवादी (संयुक्त) पक्षाकडून रुपकुमार चौधरी यांना तिकीट देण्यात आले होते. वंचित बहुजन आघाडीकडून राजेंद्र मगरे यांनी बदनापूरमधून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत कुचे यांना 105312 मते पडली होती. तर चौधरी यांना 86700 मते मिळाली होती. वंचितचा उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर होता. मगरे यांना 9869 मते मिळाली होती.  कुचे यांना मिळालेल्या मतांचे प्रमाण 49.8 टक्के तर चौधऱी यांना मिळालेल्या मतांचे प्रमाण 41 टक्के होते.   


हेही वाचा :


Jalna Vdhan Sabha Election 2024 : जालना मतदारसंघात कोणाची ताकद, महायुती जिंकणार की मविआ मारणार बाजी?