ठाणे : राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी (Election)अंतिम लढतीचं चित्र आज स्पष्ट झालं असून अनेक महापालिकेत उमेदवारांनी शेवटच्यादिवशी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने काही उमेदवार बिनविरोध झाले आहेत. राज्यात भाजप-महायुतीचेच सर्वाधिक उमदेवार बिनविरोध झाले असून एकट्या भाजपचे 35 पेक्षा जास्त उमेदवार बिनविरोध झाले आहेत. त्यामध्ये, ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल आणि भिंवडीत भाजपचे (BJP) अनेक उमेदवार बिनविरोध झाल्याने भाजप समर्थकांनी विजयी जल्लोष केला आहे. भिवंडी (Bhiwandi) महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपली ताकद दाखवत सहा उमेदवार बिनविरोध निवडून आणले आहेत. तर, दुसरीकडे शिवसेना ठाकरे गट आणि मनसेची युती फिस्कटल्याचेही दिसून आले.
भाजपकडून आज बिनविरोध झालेल्या उमेदवारांमध्ये वार्ड क्रमांक 16-अ मधून परेश चौगुले यांचा समावेश असून ते भाजप आमदार महेश चौगुले यांचे चुलत भाऊ आहेत. तसेच वार्ड क्रमांक 18-ब मधून दीपा मढवी, वार्ड क्रमांक 18-क मधून अबू साद लल्लन, वार्ड क्रमांक 18-अ मधून अश्विनी फुटाणकर आणि वार्ड क्रमांक 23-ब मधून भारती हनुमान चौधरी हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. याआधी वार्ड क्रमांक 17 मधून केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचे पुतणे सुमित पाटील यांनी बिनविरोध विजय मिळवला होता. त्यामुळे भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत भाजपच्या बिनविरोध विजयी उमेदवारांची संख्या आता 6 वर पोहोचली आहे. भिवंडी महापालिका निवडणुकीत भाजपला मिळालेल्या या यशामुळे पक्षाचे स्थान अधिक मजबूत झाले असून आगामी निवडणूक लढतींसाठी भाजपचे मनोबल उंचावल्याचे चित्र दिसत आहे.
मनसे-शिवेसना युती फिस्कटली
भिवंडी महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्यातील युती अखेर फिस्कटली आहे. मनसेसाठी ठरवण्यात आलेल्या दहा जागांपैकी चार वॉर्डांमध्ये ठाकरे शिवसेनेने थेट उमेदवारी अर्ज दाखल केल्याने दोन्ही पक्षांमध्ये तीव्र तणाव निर्माण झाला होता. वार्ड क्रमांक ६-अ, १३-अ, ११-ड आणि १७-ड या प्रभागांमध्ये शिवसेनेने उमेदवार उभे केल्यामुळे मनसेमध्ये मोठी नाराजी पसरली. अर्ज माघारीच्या टप्प्यात दोन्ही बाजूंमध्ये चर्चा झाली असली तरी तोडगा न निघाल्याने मनसेने आपले 10 पैकी 8 उमेदवार अर्ज माघारी घेतले आहे. युतीधर्म पाळला गेला नसल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येत असून, या प्रकारामुळे मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे. वरिष्ठ पातळीवर पुढील भूमिका स्पष्ट होईल. परंतु, स्थानिक पातळीवर ठाकरे सेनेच्या भूमिकेवर मनसेमध्ये मोठी नाराजी आहे.