Magathane Vidhan Sabha constituency: शिवसेनेत फूट पडल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या प्रकाश सुर्वे यांचा मतदारसंघ असलेल्या मागाठाणेमध्ये यंदा चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे. मराठी मतदारांचे प्राबल्य असलेल्या या मतदारसंघात प्रकाश सुर्वे 2014 आणि 2019 अशा सलग दोन टर्ममध्ये निवडून आले आहेत. मागाठाणे मतदारसंघ (Magathane Vidhan Sabha) हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला होता. मात्र, आता शिवसेनेत फूट पडल्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मागाठाणे मतदारसंघात शिंदे गटाच्या प्रकाश सुर्वे यांच्यासमोर ठाकरे गटाचे उदेश पाटकर आणि मनसेचे नयन कदम यांचे आव्हान आहे.
या मतदारसंघात गुजराती मतदारांची संख्याही लक्षणीय आहे. ही मतं महायुतीचे उमेदवार असलेल्या प्रकाश सुर्वे यांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. मात्र, शिवसेनेचा पारंपरिक मतदार शिंदे गट आणि ठाकरे गट यापैकी कोणाच्या पारड्यात दान टाकणार, यावर मागाठाणे मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे. 2009 साली मागाठाणे मतदारसंघातून प्रवीण दरेकर मनसेच्या तिकीटावर निवडून आले होते. 2019 मध्येही मनसेचे उमेदवार नयन कदम यांनी मागाठाणे मतदारसंघात 49,146 मते पडली होती. त्यामुळे या मतदारसंघात मनसेची ताकद अजूनही कायम असल्याचे दिसत आहे. परिणामी मागाठाणे मतदारसंघात प्रकाश सुर्वे Vs उदेश पाटकर Vs नयन कदम अशी तिहेरी लढत होईल. यामध्ये कोण बाजी मारणार, हे 23 नोव्हेंबरला स्पष्ट होईल.