Madha Vidhansabha Election 2024 : राज्यात माढा विधानसभा मतदासंघाची (Madha Vidhansabha Election 2024) जोरदार चर्चा सुरु आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीकडील तिकीट वाटप झालं आहे. मात्र, महायुतीत आणि महाविकास आघाडीत बंडखोरी झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. उद्या 4 नोव्हेंबर उमेदवारी अर्ज माघार घेण्याची शेवटची तारीख आहे. अशातच महायुतीच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. महायुतीकडून काँग्रेसच्या माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे (Minal Sathe) यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रा. शिवाजीराव सांवत ( Shivaji sawant) यांच्या गटाचे कार्यकर्ते नाराज आहे. आज झालेल्या मेळाव्यात खालच्या वरच्या दबावाला न बळी पडता निर्णय घेतला जाणार असल्याचा इशारा शिवसेना संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी कार्यकर्त्यांना दिला.
सावंत गट कोणाला पाठिंबा देणार?
काँग्रेसमधून आलेल्या मीनल साठे यांना महायुतीची उमेदवारी दिल्याने सावंत गटाचे कार्यकर्ते नाराज आहेत. आज झालेल्या मेळाव्यात आता खालच्या वरच्या दबावाला न बळी पडता निर्णय घेतला जाणार असल्याचे शिवाजीराव सावंत म्हणाले. शिवाजी सावंत यांच्या भूमिकेमुळे महायुतीच्या उमेदवार मिनल साठे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. सावंत परिवाराचा 10 तालुक्यात दबाव गट आहे. आता जो आमचा निर्णय होईल तो संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासाठी असेल असेही शिवाजी सावंत म्हणाले. शिवाजी सावंत हे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे ज्येष्ठ बंधू असून सोलापूर जिल्ह्याचे संपूर्ण राजकारण गेल्या 32 वर्षापासून शिवाजी सावंत सांभाळत आहेत. त्यामुळं आता माढा मतदारसंघात सावंत यांच्या भूमिकेमुळे नवीन ट्विस्ट तयार होण्याची शक्यता आहे. सावंत गट कोणाला पाठिंबा देणार याचा निर्णय उद्या उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर केला जाणार आहे.
माढ्यात रंगतदार तिरंगी लढत होणार?
माढ्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. माढ्याच्या नगराध्यक्षा आणि काँग्रेसच्या नेत्या अॅड. मिनल साठे यांना महायुतीकडून अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे तिकीट मिळाले आहे. मिनल साठे या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होत्या. मात्र, त्यांना डावलून शरद पवारांनी अभिजीत पाटील यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळं मिनल साठे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून तिकीट मिळवलं आहे. त्यामुळं माढ्याच्या मैदानात आता तिरंगा सामना रंगणार आहे. विद्यमान आमदार बबनदादा शिंदे यांचे पुत्र रणजित शिंदे यांनी देखील शरद पवार गटाकडे उमेदवारी मागितली होती. मात्र, त्यांना देखील डावलन्यात आलं आहे. त्यामुळं रणजित शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं माढ्यात रंगतदार तिरंगी लढत होणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! माढ्यात महायुतीचा उमेदवार ठरला, अजित पवार गटाकडून काँग्रेसच्या मिनल साठे मैदानात