मुंबई: देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे निकाल मंगळवारी जाहीर झाले. आज सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली. त्यानंतर पहिल्या साडेचार तासांमध्ये देशभरातली निकालाचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आघाडी 400 पारचा आकडा पार करेल, असा दावा केला होता. मात्र, सध्याचे चित्र पाहता एनडीए आघाडी 300 जागांच्या पलीकडे जाणेही अवघड दिसत आहे. लोकसभेच्या (Lok Sabha Election 2024) एकूण 543 जागांपैकी 270 जागांवर एनडीएचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर इंडिया आघाडी 251 जागांवर आघाडीवर आहे.
ही परिस्थिती पाहता भाजपप्रणित एनडीए आघाडीला काठावरचे बहुमत मिळण्याची शक्यता आहे. सत्तास्थापनेसाठीची मॅजिक फिगर 272 इतकी आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता एनडीए आघाडी बहुमताचा आकडा जेमतेम गाठेल, असे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात अस्थिर राजकीय परिस्थिती निर्मिती होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष सक्रिय झाला आहे. काँग्रेसच्या नेतृत्त्वाकडून तेलुगू देसम पार्टी आणि नितीश कुमार यांच्याशी बोलणी केली जाऊ शकतात, अशी शक्यता आहे. काँग्रेसने तेलुगू देसम आणि नितीश कुमार यांना आपल्या बाजूने वळवण्याचे प्रयत्न सुरु केल्यास भाजप काय करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. आंध्र प्रदेशात तेलुगू देसमचे 16 उमेदवार आघाडीवर आहेत. तर नितीश कुमार यांचा संयुक्त जनता दल हा पक्ष 12 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे इंडिया आघाडी बहुमताच्या आकड्याच्या नजीक पोहोचल्यास तेलुगु देसम आणि नितीश कुमार यांची मदत घेतली जाऊ शकते.
उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का
राम मंदिर आंदोलन, अयोध्येतील राम मंदिर आणि हिंदुत्त्वाचा अजेंडा यामुळे उत्तर प्रदेशात भाजपला मोठे यश मिळेल, अशी चर्चा होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशात 63 जागा जिंकल्या होत्या. मात्र, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात मोठा फटका बसला आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार उत्तर प्रदेशात 37 जागांवर अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष आघाडीवर आहे. तर 34 जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर आहेत. तर सात जागांवर काँग्रेसचे उमेदवार पुढे आहेत. त्यामुळे उत्तर प्रदेशात एकूण 44 जागांवर इंडिया आघाडीचे उमेदवार विजयी होऊ शकतात. तर हरियाणातही काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. हरियाणात काँग्रेस 7 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपचे उमेदवार दोन जागांवर आघाडीवर आहेत. हा भाजपसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
आणखी वाचा