नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक (Lok Sabha 2024)  आता हाकेच्या अंतरावर येऊन ठेपली आहे. त्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपनेही (BJP)  लोकसभेसाठी महाराष्ट्रासाठी मिशन 48 चा नारा दिला आहे. त्यासाठीचा मास्टर प्लॅनही भाजपने केल्याचं समजतंय. त्याचाच एक भाग म्हणजे, महाराष्ट्रातील अनेक आमदारच लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरवणार असल्याचं समजत आहे.


लोकसभेसाठी भाजपनं जोरदार प्लॅनिंग सुरु केलंय. महाराष्ट्रातही मिशन 48 चा नारा दिला आहे. त्यासाठी दिल्लीत भाजपाध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत एक महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत रवींद्र चव्हाण, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, अतुल सावे, राधाकृष्ण विखे पाटील, हर्षवर्धन पाटील, राम सातपुते  यांची उपस्थिती होती. त्यामुळं याच नेत्यांना लोकसभा लढवावी लागणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.


तीन ते चार विधानसभा मतदारसंघाचं एक क्लस्टर


भाजपनं लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनं क्लस्टरनिहाय बैठका सुरु केल्या आहेत. तीन ते चार विधानसभा मतदारसंघाचं एक क्लस्टर असं भाजपचं प्लॅनिंग आहे. भाजपच्या या रणनीतीमागे आणखी काही विशेष कारणंही असू शकतात.  लोकसभा क्षेत्रानुसार तिथले वर्तमान राजकीय समीकरण काय? भाजपची स्थिती कशी आहे? निवडणुकांच्या अनुषंगाने भाजपचे बलस्थान काय? कोणत्या कच्च्या दुव्यांकडे लक्ष द्यायचे आहे? याचा सखोल आढावा या बैठकीमध्ये घेण्यात आल्याची माहिती आहे.


महायुतीचे राज्यभर मेळावे


लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीकडून राज्यभर मेळावे घेण्यात येत आहेत. यामध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत महायुतीतील स्थानिक पक्षांचाही सहभाग आहे. महायुतीच्या जागा वाटपाची चर्चा मात्र अद्याप झालेली नाही. 


निवडणुकीसाठी टॅग लाईन तयार


 लोकसभा निवडणुकांसाठी (Loksabha Election) भाजपकडून (BJP) नवा नारा देण्यात आलाय. 'सपने नहीं हकीकत बुनते हैं, इसलिए तो सब मोदी को चुनते हैं' असा नवा नारा आता भाजपकडून देण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने सार्वत्रिक निवडणुकीत स्वबळावर दोनदा बहुमत मिळवले आहे. 2014  मध्ये पक्षाने 'अच्छे दिन आने वाले हैं' असा नारा दिला होता. तर 2019 मध्ये  'फिर एक बार मोदी सरकार' या टॅग लाईनने प्रचार केला होता.  


हे ही वाचा :


Uddhav Thackeray : राहुल नार्वेकरांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलं; महापत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंकडून चिरफाड, राहुल नार्वेकरांवर हल्लाबोल