नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election) 7 टप्प्यात मतदान पार पडतेय. काँग्रेसनं (Congress) यावेळी इंडिया आघाडीचा प्रयोग करुन निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलीय. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत चारशे पेक्षा जास्त जागांवर निवडणूक लढणाऱ्या काँग्रेसनं यंदा मात्र मित्र पक्षांसाठी 101 जागा सोडल्या आहेत. काँग्रेस यंदा 328 जागांवर निवडणूक लढवतेय. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसनं 421 जागांवर उमेदवार दिले होते. यासंदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेस या इंग्रजी वृत्तपत्रानं दिलं आहे.
काँग्रेस 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत कमी जागांवर निवडणूक लढवतेय. काँग्रेसनं यावेळी 330 जागांवर उमेदवार दिले होते. मात्र, त्यातील दोन उमेदवारांनी ऐनवेळी माघार घेतल्यानं त्यांची संख्या 328 वर आली आहे. देशभरात काँग्रेस कमी जागांवर निवडणूक लढत असली तरी कर्नाटक, ओडिशा आणि मिझोरम या राज्यांमध्ये 2019 च्या तुलनेत अधिक जागांवर निवडणूक लढवतेय. कर्नाटकमध्ये यापूर्वीच्या निवडणुकीत काँग्रेसनं 21 जागांवर निवडणूक लढवली होती. यावेळी काँग्रेस सर्व जागांवर म्हणजेच 28 जागांवर निवडणूक लढवत आहे. दुसरीकडे ओडिशामध्ये देखील सर्वच्या सर्व 20 जागांवर काँग्रेस लढतंय.
काँग्रेसनं कोणत्या राज्यांमध्ये सर्वाधिक जागा सोडल्या?
काँग्रेसनं 2019 च्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीचा विचार केल्यास सर्वाधिक जागा उत्तर प्रदेशमध्ये सोडल्या आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसनं 67 जागा लढवल्या होत्या. यावेळी काँग्रेस तिथं 17 जागा लढतेय. म्हणजेच उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसनं 50 जागा यावेळी कमी लढवल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये काँग्रेसनं गेल्या लोकसभा निवडणुकीत 40 जागा लढवल्या होत्या यावेळी तिथं ते 14 जागा लढवत आहेत. म्हणजेच पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस यावेळी 26 जागा कमी लढत आहे. महाराष्ट्रात 2019 ला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होती. त्यावेळी काँग्रेसनं 25 जागा लढवल्या होत्या. आता महाविकास आघाडीत काँग्रेस 17 जागा लढवत आहे.
मित्र पक्षांसाठी अधिक जागा सोडल्या
काँग्रेसनं 2004 मध्ये 417 जागांवर निवडणूक लढवली होती. पुढील लोकसभा निवडणुकीत म्हणजेच 2009 ला काँग्रेसनं 440 जागांवर निवडणूक लढवली होती. 2014 मध्ये 464 आणि 2019 ला 421 जागांवर निवडणूक लढवली होती. आता काँग्रेस स्वबळावर 328 जागांवर निवडणूक लढतेय.
काँग्रेसनं इंडिया आघाडीत पश्चिम बंगालमध्ये डाव्या पक्षांसोबत आघाडी केलीय. उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाची आघाडी आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत आघाडी केलीय. महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गट 21, काँग्रेस 17 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष 10 जागांवर निवडणूक लढतेय. काँग्रेसची दिल्ली आणि हरियाणात आम आदमी पार्टी सोबत आघाडी झाली आहे. याशिवाय देशभरात इंडिया आघाडीतील इतर राजकीय पक्षांना देखील काँग्रेसनं जागा सोडल्या.
संबंधित बातम्या :