Laxman Hake on Ajit Pawar: पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीत (Pune Election 2026) उमेदवार निवडीवरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर तीव्र टीका होत आहे. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणेची पत्नी जयश्री मारणे हिने अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एबी फॉर्मवर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल केली आहे. विशेष म्हणजे, सध्या गजा मारणे तुरुंगात असून, त्याच्या गुन्हेगारी कारवायांची राज्यभर ओळख आहे.
याचप्रमाणे आयुष कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी कुख्यात गुंड बंडू आंदेकर याची भावजय लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी दाखल केली आहे. हे सर्व आरोपी सध्या तुरुंगात असून, निवडणूक लढवण्यासाठी त्यांनी तुरुंग प्रशासनाकडून विशेष परवानगी घेतल्याची माहिती आहे. गजा मारणे आणि बंडू आंदेकर या दोन्ही टोळ्यांचे गुन्हेगारी कारनामे राज्यभर चर्चेत असताना, त्यांच्या कुटुंबीयांना थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे. याचबरोबर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कुख्यात गुंड बापू नायर यांच्या पत्नीलाही पुण्यातून उमेदवारी दिल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सर्व स्तरांतून टीकेची झोड उठली असून, ओबीसी नेते व आंदोलक लक्ष्मण हाके (Laxman Hake) यांनी तीव्र शब्दांत अजित पवारांवर हल्लाबोल केला आहे.
Laxman Hake: बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांनी कोणतं दिव्य काम केलं?
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंतीनिमित्त अभिवादनासाठी आले असताना लक्ष्मण हाके यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील 67 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांचे कॅरेक्टर चेक करा, ते कोणत्या पक्षाचे आहेत ते चेक करा. असे कोणते दिव्य काम केलं आहे. बाबासाहेबांनी दिलेल्या लोकशाहीत निवडणुकीला टाळून महाशय महान व्यक्तींना बिनविरोध केले, त्यांचे कॅरेक्टर चेक करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
Laxman Hake on Ajit Pawar: फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेतात, पण...
हाके यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना म्हटले, “अजित पवार सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला नतमस्तक होतात. फुले, शाहू, आंबेडकरांचे नाव घेतात. पण दुसरीकडे उमेदवारी देताना बोडके, आंदेकर, नायर यांसारख्या गुंडांच्या कुटुंबीयांना तिकीट दिले जाते. हीच त्यांची रणनीती आहे. अजित पवारांच्या मुखामध्ये फुले-शाहू-आंबेडकर आणि उमेदवारीचे तिकीट बोडके, आंदेकर, नायर यांना देतात,” असे म्हणत हल्लाबोल केलाय.
Laxman Hake on Ajit Pawar: लोकशाहीची ऐशी-तैशी झालीय
लक्ष्मण हाके यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरही टीका करत, “हे दोघे वेगळे नाहीत, एकच होते. आज ओबीसी आरक्षण संपले आहे. पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिकेच्या यादीवर नजर फिरवा. मराठा कुणबी सर्टिफिकेट काढून ओबीसी आरक्षण संपवले जात आहे. “गुंड, मवाली, पैसे वाल्यांना, मनी-मसल पॉवर आणि बोगस दाखले असलेल्यांनाच तिकीट दिली जात आहेत. त्यामुळे लोकशाहीची ऐशी-तैशी झाली आहे,” असा गंभीर आरोप करत हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार निवडीवर कठोर शब्दांत प्रहार केलाय.
आणखी वाचा
