मुंबई : उत्साहाच्या भरात एखादा नेता काहीतरी बोलून जातो. मग बॅकफायर झाल्यावर सारवासारव करण्याची वेळ पक्षावर येते. सध्या भाजपचे राज्यातले दोन सर्वात मोठे नेते, म्हणजे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) याचाच अनुभव घेतायत. निमित्त झालंय चव्हाणांच्या एका वाक्याचं. ज्या लातूरमध्ये चव्हाणांनी चूक केली तिथेच जाऊन डॅमेज कंट्रोल करण्याची वेळ फडणवीसांवर आली.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी लातूरमध्ये प्रचाराच्या भरात एक चूक केली. विलासराव देशमुखांच्याबद्दल त्यांच्या एका वाक्यावरुन वाद सुरु झाला. भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून विलासरावांच्या आठवणी या शहरातून नक्कीच पुसल्या जातील यात शंका नाही असं रवींद्र चव्हाण म्हणाले.
रवींद्र चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर लातूरमध्ये काँग्रेस कार्यकर्ते आणि विलासरावप्रेमी नाराज झाले. विलासरावांच्या मूळ गावात म्हणजे बाभुळगावात कडकडीत बंद पाळण्यात आला. पण आमदार अमित देशमुखांनी लातूरकरांना बंद न पाळण्याचं आवाहन केलं.
भावनिक राजकारणात भाजपची चूक
भावनिक राजकारणात रवींद्र चव्हाणांची ती चूक भाजपला महागात पडण्याची शक्यता निर्माण झाली. ती चूक सुधारण्यासाठी रवींद्र चव्हाण आणि देवेंद्र फडणवीसांनी मंगळवारी स्पष्टीकरणही दिलं.
मात्र, तेवढं पुरेसं नव्हतं. मुख्यमंत्री फडणवीस प्रचारासाठी लातूरमध्ये पोहोचले आणि त्यांनी लातूरकरांची नाराजी दूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.
फडणवीसांनी आपल्या भाषणात विलासराव देशमुखांची स्तुती केली. फक्त विलासरावच नाही तर शिवराज पाटील चाकूरकर, शिवाजीराव निलंगेकर, अगदी गोपीनाथ मुंडेंची आठवण काढत लातूरकरांच्या भावनांना हात घातला.
विलासरावांबद्दल आदर, मुख्यमंत्र्यांची भावना
विलासराव देशमुख म्हणाले की, "लातूर ही अशा लोकांची भूमी आहे... ज्यांनी लातूरला खूप मोठी नेतृत्व दिली आहेत. शिवराज पाटील चाकूरकर यांची राजकीय कारकीर्द लक्षात येते. नगराध्यक्षापासून सुरू झालेलं त्यांचं काम आणि नंतर त्यांनी देशाचे नेतृत्व केले आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले शिवाजीराव पाटील निलंगेकर आणि विलासराव देशमुख यांनी राज्यासाठी खूप काम केले आहे. रवींद्र चव्हाण यांनी बोलताना काही चूक झाली असेल तर त्यांबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. लातूर ज्यांची जन्मभूमी नव्हती... पण कर्मभूमी होती त्या गोपीनाथ मुंडे यांचेही स्मरण यावेळी केलं पाहिजे. या भूमीत नेतृत्व तयार करण्याचे गुण आहे. सभास्थळी हजर असलेला प्रत्येकाने लातूरच्या विकाससाठी काम केले आहे."
फडणवीसांनी आपल्या भाषणात विलासरावांबद्दल आदर तर व्यक्त केला, पण रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याबद्दल दिलगिरीही व्यक्त केली. हे करत असतानाच त्यांनी अतिशय मुद्देसुदपणे, वैयक्तिक दोषारोप न करता लातूरच्या न झालेल्या विकासाचा पंचनामाही केला.
देवेंद्र फडणीस म्हणाले की, "11 एप्रिल 2016 या दिवशी लातूरला रेल्वेने पाणी आणावं लागलं. त्यादिवशी ठरवलं या संकटाचं संधीत रूपांतर करायचं आहे. लातूरमध्ये पुन्हा कधीही रेल्वेने पाणी येऊ नये यासाठी काम करायचं आहे. त्यासाठी वेगवेगळ्या योजना केल्या आहेत. मी कोणावरही टीका करणार नाही... काही लोकांनी निवडून आलो तर शंभर दिवसात पाणी देऊ असं म्हटलं होतं. त्यांनी पाणी दिलं नाही आणि राजीनामाही दिला नाही. 2014 नंतर शहर विकासाच्या योजना आणल्या. 70 वर्षापासून एका राज्यकर्त्यांची भूमिका होती, भारत हा गावातच राहतो... त्याचवेळी राज्यकर्त्यांना विसर पडला की भारतात शहरही आहेत आणि त्यांचे नियोजन करावे लागेल."
लातूरचा विकास हे एकमेव ध्येय आहे. चाकूरकर साहेबांचे स्मारक या महानगरपालिकेत झालं पाहिजे ही अतिशय योग्य मागणी आहे. राज्य शासनाच्या पैशाने त्या ठिकाणी स्मारक उभे करण्यात येणार आहे. भाजपाला सत्ता द्या आम्ही लातूरचा चेहरा आधुनिक करून दाखवू असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी दिलं.
खरं तर लातूरच्या संथ विकासाचे असदुद्दीन ओवैसींनी लातूरमध्ये जाऊन वाभाडे काढले होते. तेवढ्यावरच न थांबता ओवैसींनी नाना पटोले आणि अमित देशमुखांवर गंभीर आरोपही केले होते. मात्र रवींद्र चव्हाण ओवैसींएवढे नशीबवान ठरले नाहीत. चव्हाणांच्या एका वाक्याने भाजप बॅकफूटवर गेली.
खरंतर भाजप जास्त सावध भूमिका घेण्यालाही तसं कारण आहे. लोकसभेला बारामती आणि शरद पवारांवर पंतप्रधान मोदींनी टीका केली होती. त्याचा भाजपला चांगलाच फटका बसला होता. लोकसभेतील उदाहरणापासून शिकल्याचं दाखवत, भाजपने विलासरावांबद्दल तात्काळ दिलगिरी व्यक्त केली. फडणवीसांनी डॅमेज कंट्रोलचा भाग सांभाळला. त्याचा किती परिणाम होणार हे 16 तारखेला कळेलच.
ही बातमी वाचा: