Pune Bypoll election ravindra dhangekar : पुण्यातील कसबा (Pune Bypoll Election) पोटनिवडणुकीत चुरशीची लढत सुरु आहे. कसब्याची निवडणूक जाहीर झाल्यापासून कसब्यात करण्यात आलेली बॅनरबाजी निवडणुकीपेक्षा जास्त चर्चेचा विषय ठरली आहे. त्यात आता राजकीय फायद्यासाठी देवांचा वापर करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर (Ravindra dhangekar) यांनी केला आहे. त्यांनी फेसबुक पोस्ट करत हा आरोप केला आहे. या बॅनर मार्फत त्यांनी विरोधात उभे असलेले भाजपचे उमेदवार हेमंत रासने यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. 


फेसबुक पोस्टमध्ये नेमकं काय लिहिलंय?


यांचा सोनं-चांदी वाटण्याचा स्पीड असाच राहिला चौकातील गणपती मंडळ 'श्रीमंत' व्हायला वेळ लागणार नाही. माननीय विश्वस्त साहेब, स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी आमच्या गणपती बाप्पाचा वापर करणं बंद करा, असं  रविंद्र धंगेकर यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे. त्यांची ही पोस्ट सध्या कसबा मतदार संघात चांगलीच चर्चेचा विषय ठरत आहे


ही पोस्ट करुन महाविकास आघाडीचे उमेदवार रविंद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला आहे. हेमंत रासने हे दगडूशेठ हलवाई गणपतीचे विश्वस्त आहेत. मतदानासाठी गणपती मंडळांना सोनं-चांदी वाटप करत असल्याचा आरोप धंगेकरांनी केला आहे. यावर आता भाजप काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 


 




धंगेकर विरुद्ध रासने


कसब्यात रविंद्र धंगेकर विरुद्ध हेमंत रासने अशी तगडी लढत बघायला मिळत आहे. पोटनिवडणूक जाहीर झाल्यापासून महाविकास आघाडीकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे लक्ष लागलं होतं. महाविकास आघाडीकडून कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या कसब्यात धंगेकरांना उमेदवारी देण्यात आली. धंगेकर यांनी यापूर्वी अनेक निवडणूका लढवल्या आहेत. आतापर्यंत 25 वर्ष ते नगरसेवक राहिले आहे. त्यांनी मागील निवडणुकीत भाजपचे किंगमेकर गिरीश बापटांच्या विरोधात त्यांनी निवडणुक लढवली आहे. त्यावेळी ते पराभूत झाले मात्र त्यावेळी धंगेकरांना चांगली मतं पडली होती. त्यामुळे यावेळी धंगेकरांना उमेदवारी दिल्याने भाजपची डोकेदुखी वाढली आहे.  


भाजप आणि महाविकास आघाडीसाठी कसब्याची पोटनिवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे. राज्यात सत्तानंतर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने भाजप-शिंदे गट विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना या पोटनिवडणुकीत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतराबाबत  दावे - प्रतिदावे करण्यासाठी या निवडणूक निकालाचा उपयोग होणार आहे. यात प्रत्येक पक्षाकडून निवडणूक जिंकण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु आहे.