Maharashtra Kalyan News : कल्याण : महाराष्ट्रात सोमवारी लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election 2024) पाचव्या टप्प्याचं मतदान पार पडलं. महाराष्ट्रात (Maharashtra News) 54.16 टक्के मतदान झालं आहे. पण संपूर्ण महाराष्ट्र भरात अनेक मदतान केंद्रांवर गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. कुठे दोन पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. तर अनेक ठिकाणी ईव्हीएम मशिन्स बंद पडल्याचं पाहायला मिळालं. अशातच काही मतदान केंद्रांवर मतदारांची नावं मतदार यादीतून गाहाळ असल्याचं समोर आलं. याप्रकरणी संतप्त झालेले मतदार आता थेट कोर्टात धाव घेणार असल्याचं समोर आलं आहे.
महाराष्ट्रातील पाचव्या आणि शेवटच्या टप्प्यातील मतदान सोमवारी पार पडलं. मतदान सुरू असताना अनेकांची नावं मतदारयादीतून गहाळ झाल्याचा प्रकार अनेकांच्या लक्षात आला. त्यानंतर समाजमाध्यमात याविषयी चर्चाही झाली. अनेकांकडे मतदार ओळखपत्र असूनही मतदार केंद्रावर गेल्यावर यादीत नाव नसल्याचा प्रकार अनेक मतदारांच्या लक्षात आलं. मतदारयादीतील नावं गहाळ झाल्याच्या प्रकाराविरोधात कल्याण मतदारसंघात न्यायालयात जाऊन दाद मागण्याची तयारी केली जात आहे. त्यासाठी अशा नागरिकांनी आपली माहिती कळवावी, असं आवाहन अक्षय फाटक यांनी केली आहे.
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू असताना काही मतदारांना मतदानकेंद्रावर गेल्यावर आपलं नाव यादीतून गहाळ झाल्याचं लक्षात आलं. वर्षानुवर्ष एकाच मतदारसंघात मतदान करणाऱ्यांचंही नाव यंदाच्या मतदारयादीत नसल्याचं सांगितलं गेल्याचा दावा अनेकांनी समाजमाध्यमांत करण्यात आला आहे.
पत्नीचं नाव मतदारयादीत आहे, पण पतीचं नाव यादीत नाही, असेही अनेक प्रकार काही मतदारसंघांत घडल्याचं पाहायला मिळाल्याचंही अनेकांनी सांगितलं आहे. मतदान करणं हा नागरिकांचा अधिकार आहे आणि ज्यांना तो बजावता आला नाही, त्यांच्या वतीनं न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी कल्याण लोकसभा मतदारसंघात करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ता अक्षय फाटक यांनी एक गुगल फॉर्मची लिंक तयार करून अशा सर्व मतदारांना आपली माहिती देण्याचं आवाहन केलं आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघापर्यंतच ही मोहीम मर्यादित ठेवण्यात आली होती. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अकराशेहून जास्त नागरिकांनी गुगल फॉर्मवर माहिती भरल्याचं अक्षय फाटक यांनी सांगितलं आहे. अशा सर्व मतदारांसाठी न्यायालयीन मार्गानं प्रयत्न करणार असल्याचं अक्षय फाटक यांनी म्हटलं आहे. तसेच, न्यायालयीन मार्गानं लढाई लढण्यासाठी अशा नागरिकांनी आपली माहिती भरावी, असं आवाहन फाटक यांनी केलं होतं.