Kalyan Dombivli Municipal Corporation elections : कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकांच्या मतदानाला अवघे काही तास उरलेत मात्र अद्यापही राष्ट्रवादी शरद पवार गटातला गोंधळ काही संपला नसल्याचे समोर आले आहे. पॅनल क्रमांक चार ड मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून रामदास वळसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गेल्या नऊ दिवसांपासून त्यांचा प्रचार देखील सुरू होता. मात्र, काल दुपारच्या सुमारास अचानक सोशल मीडियावर राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा उबाठाच्या उमेदवाराला असल्याचे पत्र काढलं आहे. हे पत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.
स्थानिक पदाधिकाऱ्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला
दरम्यान, मतदानाला काही तास उरलेले असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार मात्र गोंधळलेले असलेले पाहायला मिळाले. याबाबत वळसे यांनी सांगितले की मला राष्ट्रवादी शरद पवार गटाने अधिकृत उमेदवारी दिली आहे. मात्र, स्थानिक पदाधिकाऱ्यांनी माझ्या पाठीत खंजीर खुपसला आहे. वरिष्ठ नेत्यांना मला कोणालाही विश्वासात न घेता पक्षाचा अधिकृत उमेदवार असताना देखील माझ्या विरोधात असलेल्या उबाठाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे. याबाबत मी वरिष्ठांना तक्रार केली आहे. प्रत्यक्षात याबाबत या पदाधिकाऱ्यांनी कोणत्याही वरिष्ठांशी चर्चा केलेली नाही त्यांनी उगाच हा संभ्रम निर्माण केल्याची माहिती वळसे यांनी सांगितली आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती
कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत भाजप-शिंदेसेना-रिपाई यांची युती झाली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गट स्वतंत्र निवडणूक लढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत उद्धवसेना-मनसे यांची युती झाली आहे. तर काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गट आणि वंचित बहुजन आघाडी यांची युती झाली आहे. तर आम आदमी पार्टी स्वतंत्र निवडणूक लढवत आहे. महाराष्ट्रातील आगामी महापालिका निवडणुकांचा उत्साह शिगेला पोहोचलाआहे.
उद्या म्हणजेच 15 जानेवारीला मतदारांचा कौल मतपेटीत कैद होणार आहे. तर 16 जानेवारीला राज्यातील महापालिकांचे चित्र स्पष्ट होणार आहे. एकीकडे हि कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याचे जरी बोलल्या गेलं तरी राज्यातील अलीकडे जाहल्या राजकीय स्थित्यांतरानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून आल्या आहे. त्यामुळे हि निवडणूक प्रतिष्ठेची झाली असल्याचेही दिसून आलंय.
महत्वाच्या बातम्या:
Mahapalika Prachar Sabha : महापालिका प्रचार सभेच्या शर्यतीत राज्यात मुख्यमंत्री फडणवीसांची सरशी; तर ठाकरे बंधूंच्या सर्वात कमी सभा, कोणी किती सभा घेतल्या?