बीड: ग्राम पंचायत निवडणुकीत अनेक धक्कादायक, आश्चर्यकारक निकाल लागत आहेत. बड्या बड्या नेत्यांचा धक्के बसत असताना, तिकडे बीडमध्ये तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrashekhar Rao) यांच्या भारत राष्ट्र समिती (Bharat Rashtra Samithi) अर्थात बीआरएसने (BRS) खातं उघडलं. ग्राम पंचायतीच्या माध्यमातून बीआरएसने महाराष्ट्रात पहिली एन्ट्री घेतली. गेवराई तालुक्यातील रेवकी ग्रामपंचायतीत (Revki Gram Panchayat) बीआरएसने सर्वच्या सर्व 9 जागा जिंकल्या. शशिकला भगवान मस्के (Shashikala Maske) या बीआरएसच्या सरपंचपदाच्या उमेदवार विजयी झाल्या.


गेवराईत बीआरएस कसं जिंकलं?


बीडमध्ये गेवराई तालुक्यातील रेवकी ग्रामपंचायत बीआरएसकडे आली.शशिकला भगवान मस्के यांनी गुलाल उधळत,सरपंचपदाची माळ मिळवली. मूळचे अजित पवार यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब म्हस्के हे राष्ट्रवादीत होते. त्यांची पत्नी मयूरी खेडकर मस्के या भाजपमध्ये होत्या. मात्र दोघांनी काही महिन्यांपूर्वीच एकत्र येत,तिसरा पर्याय BRS चा निवडला. 


आतापर्यंत विकास नव्हता, प्रस्थापितांची दडपशाही, दबाव पाहून आम्ही बीआरएसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला, असं मयूरी मस्के यांनी एबीपी माझाला सांगितलं. गाव तिथे शिबीर घेत नियोजन केलं. विधानसभेच्या सर्व गावांमध्ये पोहोचलो. त्यानंतर मयूरी यांच्या सासूबाई शशिकला मस्के यांना सरपंचपदाची उमेदवारी देण्याचा निर्णय बीआरएसने घेतला. आम्ही "सासूबाईंना निवडणुकीत उभं करण्याबाबत गावात सभा घेऊन विचारणा केली. गावकऱ्यांनी होकार दिला आणि निवडणुकीचा निकाल समोर आला" असं मयूरी यांनी सांगितलं. 


बीआरएसने 9 उमेदवार रिंगणात उतरवले होते. त्यापैकी ऋषिकेश बांगर बिनविरोध ठरले. 8 उमेदवार प्रत्यक्ष निवडणुकीला सामोरे गेले. ते सर्वच्या सर्व निवडून आले. सरपंचपदाच्या उमेदवार शशिकला मस्के या 800 मतांनी विजयी झाल्या. या विजयानंतर यह तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है, अशी प्रतिक्रिया मयूरी मस्के यांनी दिली. गावच्या विकासाला प्राधान्य, प्रत्येक नागरिकाच्या अडीअडचणी आपल्या मानून काम करु असंही त्यांनी सांगितलं.


के चंद्रशेखर राव यांची महाराष्ट्राला पसंती - 
के चंद्रशेखर राव यांनी आपल्या बीआरएस पक्षाचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्रातून सुरुवात केली. आषाढी एकादशीला तेलंगणामधून तब्बल ३०० गाड्यांचा ताफा घेऊन के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात ग्रँड एंट्री केली. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएस पक्षात राज्यातील अनेक नेत्यांनी प्रवेश केला होता. चंद्रशेखर राव यांनी मागील काही दिवसात महाराष्ट्रात अनेक सभा घेत शेतकऱ्यांना अश्वासने दिली आहेत. त्याशिवाय सत्ताधारी भाजपवर त्यांनी टीकाही केली.  केसीआर यांनी मराठवाड्यातील नांदेड येथून महाराष्ट्रात प्रचाराला सुरूवात केली होती, नांदेड येथे घेतलेल्या सभेत त्यांनी अबकी बार किसान की सरकार असी घोषणा दिली होती.


आणखी वाचा :


Gram Panchayat Election Result : तेलंगणातील BRS ची महाराष्ट्रात एन्ट्री, १० ग्रामपंचायतीवर फडकावला झेंडा