पुणे: राज्यभरात एकीकडे निवडणुकांची जय्यत तयारी सुरू आहे. आपल्या पक्षाचा,आणि युतीचा उमेदवार निवडून यावा यासाठी मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. या दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षांचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या सोशल मिडिया एक्स (पुर्वीचे ट्विटर) वरती एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओमुळे सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आलं आहे. आव्हाड यांनी आपल्या पोस्टमध्ये 'अजित पवारांची दादागिरी नही चलेगी नही चलेगी', असं म्हणत एक व्हिडिओ शेअर केला आहे. तर हा व्हिडिओ श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यातील असल्याची सूत्रांची माहिती असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. 


नेमकं काय आहे व्हिडिओमध्ये? 


जितेंद्र आव्हाडांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे काही लोकांसोबत बैठक घेत आहेत, त्यावेळी ते कारखान्याचा उल्लेख करत आहेत. 






नेमकं काय लिहलं आहे पोस्टमध्ये? 


अजित पवारांची दादागिरी नही चलेगी नही चलेगी 
(सदर व्हिडिओ श्री दत्त इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कारखान्यातील असल्याची सूत्रांची माहिती)
मला तुमची साथ हवी आहे. कुणाच्या दबावाला घाबरायची गरज नाही. आधी रामराजे यांचं ऐकलं आता माझं ऐकावं अशी विनंती आहे. इथ जरी कुणाचही युनिट असलं तरी पुढं चालवायचं की नाय चालवायचं ह्याबाबत मी बरच काही करू शकतो.... बोला... दबाव आहे का तुमच्यावर? 
कामगार- तुमच्या सहकार्याने आणि मदतीने बंद असलेला साखर कारखाना त्यांनी सूरू केला. 
अजित पवार - हे साफ चुकीचं आहे. धारुला नीट विचारा कुणी काय मदत केली ते. तिकडं सगळी सुत्र आम्ही हलवली. मला बरंच काही करता आलं असतं. कुणी म्हणत होतं धारूने नाही अजित पवारने कारखाना घेतला. शेजारी असणारा शरयू कारखाना माझ्या बंधूने घेतला...... त्यावेळीं ह्या कारखान्याबाबत माझ्याकडे सुद्धा ऑफर आली होती. त्यावेळीं सगळं काही झालं होतं परंतु माझ्या माळेगाव आणि सोमेश्वर कारखान्याच याच परिसरात युनिट असल्यामुळे मी काही केलं नाहीं . परंतु आता मी जर काही गंमत करायची ठरवली तर खूप काही करू शकतो. परत तुम्ही रडत माझ्याकडे याल... चूक झाली आमचा गैरसमज झाला म्हणुन.... मी एकतर कुणाच्या नादाला लागत नाही तुम्हाला कुणालातरी मतदान करायचं आहे. 
कदाचित तुम्हाला काही वाटत असेल तर ठिक आहे. मला तर माझी जागा निवडून आणायची आहे. त्यासाठी जिवाचं रान करायचं आहे. परंतु नंतर अशी वेळ येईल की त्यावेळीं तुमच्या डोळ्यात पाणी येईल तुम्ही काहीच करू शकणार नाही. मग मी धारूच सुद्धा ऐकणार नाही.