Continues below advertisement

सांगली : काँग्रेसला संपवायला निघालेली भाजप आता काँग्रेसयुक्त झाली आहे. काँग्रेसमधून गेलेल्या नेत्यांनी भाजप ताब्यात घेतली आहे, तर भाजपचे निष्ठावान फक्त सतरंज्या उचलत आहेत असा टोला माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी लगावला. तर महाराष्ट्राच्या विकासात योगदान दिलेल्या मोठ्या नेत्यांची नावं भाजपला पुसायची आहेत, मतदारांनी त्यांना धडा शिकवावा असं आवाहन खासदार विशाल पाटील (Vishal Patil) यांनी केलं. सांगली महापालिका निवडणुकीसाठी जयंत पाटील, खासदार विशाल पाटील यांची एकत्रित सभा पार पडली. सांगलीच्या कुपवाड भागातील प्रभाग क्रमांक 1 मधील विजय घाडगे, अभियंता सूर्यवंशी, रईसा रंगरेज, शेडजी मोहिते या शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आणि काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत जयंत पाटील, खासदार विशाल पाटील सभा घेतली. त्यामध्ये या दोन्ही नेत्यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

काय म्हणाले जयंत पाटील?

काँग्रेसला या देशातून हाकला असे भाजपची लोक म्हणत होते, पण आजची भाजप ही काँग्रेसयुक्त भाजप झाली आहे. आज भाजपमध्ये एवढे काँग्रेसचे लोक गेलेत की निष्ठावंत भाजपवाले सतरंज्या उचलत आहेत. जे काँग्रेस मधून भाजपमध्ये गेलेत त्यांनी भाजप पक्षाचा ताबा घेतला आहे अशी खरमरीत टीका जयंत पाटील यांनी भाजप पक्षावर केली आहे.

Continues below advertisement

निवडणुकीत पडणाऱ्या पावसाच्या विरोधात नाही

जयंत पाटील यांनी अप्रत्यक्षपणे निवडणूक काळात मतदारांना वाटल्या जाणाऱ्या पैशावर टिप्पणी केली. ते म्हणाले की, "भाजप हा वाममार्गाने सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतोय. आता महापालिकेच्या निवडणुकीत देखील प्रचंड पाऊस पडेल. डोहात बुडून जाईल इतका पाऊस पडणार आहे. पण यावेळी लोकांनी खंबीरपणे या पावसात उभे राहावे. आम्ही निवडणुकीत पडणाऱ्या पावसाच्या विरोधात नाही. निवडणुकीत पडणाऱ्या पावसाने तुमच्या घरात पाणी जरी आले तरी आमचा विरोध नाही, त्या पावसात आंघोळ करून घ्या. पण पुढच्या पाच वर्षासाठीची महापालिका निवडणुकीची सत्ता मिळवण्यासाठी हा पाऊस पडतोय हे मतदारांनी लक्षात ठेवावं."

आज सांगलीत नशेचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे. पोलिसांना नशा नेमकी होते कुठे हे सापडत नाही. मोठ्या प्रमाणावर सांगलीत खून होत आहेत. ब्रिटिशांच्या विरोधात वसंतदादा लढले, सांगलीचा तुरुंग फोडून बाहेर आले, अशा वसंतदादांच्या मनोवृत्तीचे हे सांगली शहर आहे. जे ब्रिटिशांना शरण गेले नाही ते या कमळाला कसे शरण जाईल? असं जयंत पाटील म्हणाले.

जयंत पाटील पुढे म्हणाले की, "सागली करू चांगली असं सध्याच्या पंतप्रधानांनी काही वर्षांपूर्वी सांगलीत येऊन घोषणा केली होती. पण आतापर्यंत सांगलीला काही मिळालं नाही. भाजपने आतापर्यंत वेगवेगळ्या शहरामध्ये दिलेली आश्वासन फेल झाली आहेत. परवा मुख्यमंत्र्यांनी देखील सांगलीत येऊन मोठी आश्वासन सांगलीसाठी दिली. मात्र गेली अनेक वर्ष राज्यात कुणाची सत्ता आहे?

आतापर्यंत विकास का नाही?

परवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण आणि त्या अनुषंगाने भाषणात सांगली शहरासाठी केलेल्या घोषणा ऐकून माझे डोके दुखायला लागले असे खासदार विशाल पाटील म्हणाले. मुख्यमंत्री नेमके 2014 चे भाषण करत होते की 2021 सालचे करत होते हे कळलं नाही. कारण देशात पंतप्रधान भाजपचे आणि महाराष्ट्रात मुख्यमंत्री देखील भाजपचे आहेत, मग आतापर्यंत या लोकांनी सांगली शहराचा विकास का केला नाही असा सवाल विशाल पाटील यांनी उपस्थित केला.

लाडकी बहीण योजना आधी काँग्रेसने कर्नाटकात आणली, ती यशस्वी योजना भाजपने महाराष्ट्रात आणली आणि त्याचा निवडणुकीमध्ये काही प्रमाणात भाजपला फायदा देखील होतोय असं विशाल पाटील यांनी दिली. मात्र पैशाच्या जोरावर राजकारण करणाऱ्या भाजपला एक झटका दिला तर आपली किंमत राहील. पैशाच्या जोरावर चांगली घराणे भाजपमध्ये घेतली जात आहेत.

दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष लातुरात जाऊन म्हणतात की विलासराव देशमुख यांचा विचार संपवायचा आहे. या भाजपच्या लोकांना विकास करायचा आहे की ज्यांनी महाराष्ट्राचा विकास केला किंवा महाराष्ट्राच्या विकासात ज्यांचे मोठे योगदान आहे अशा नेत्याची नावे पुसायच आहेत? असा प्रश्नही विशाल पाटील यांनी आपल्या भाषणात केला.