मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिवाजी पार्कवरील ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेला संबोधित केलं. उद्धव ठाकरेजी तुम्ही उशिरा आलात पण आक्रमक आणि मुद्देसूद भाषण आदित्य ठाकरेंचं मी ऐकलं, मुंबईची नस, मुंबईला काय पाहिजे, मुंबईला काय हवंय याची ओळ नं ओळं आदित्य ठाकरेंना माहिती आहे. उद्धवजी मुंबईची जबाबदारी आदित्य ठाकरेंकडे देऊन तुम्ही महाराष्ट्राकडे लक्ष द्यावं, असं जयंत पाटील म्हणाले.
आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या शब्दामुळं मुंबई मराठी माणसाची ही भावना देशभर पसरली. ते होते या मुंबईत मराठी माणूस स्वाभिमानानं ठामपणे उभा राहिला हे महाराष्ट्रात कोणी विसरता कामा नये. आजच्या मंचावरील पोस्टर पाहून आनंद होतोय की भावकी एक झाली आहे. मुंबईत फिरलो लोकांना राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्याचा लोकांना आनंद झाला आहे. शिवतीर्थ भरलेय पण महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील माणूस बघतोय याचा राजकारणावर काय परिणाम होणार हे पाहतोय. तुम्ही दोघं एकत्र आलात यासाठी शरद पवार यांच्यावतीनं अभिनंदन करतो. पवारसाहेब येणार होते पण त्यांना जमलं नाही, त्यांनी मला यायला सांगितलं, असं जयंत पाटील म्हणाले.
आम्ही नेहमी बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण टीव्हीवर पाहायचो. तेच मैदान आहे, तिच शिवसेना आहे, मात्र शत्रू वेगळा आहे. काही गद्दार आहेत, तर काही दिल्लीतील सत्तेचे गुलाम आहेत. मला खात्री आहे की मुंबईकर या सगळ्यांना खड्यासारखं बाजूला ठेवल्याशिवाय राहणार नाही, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.
19 जून 1966 ला या शिवतीर्थावर शिवसेनेची स्थापना झाली, त्याच वेळी माझे नेते शरद पवार यांनी बाळासाहेब ठाकरे यांचं भाषण इथल्याच एका कट्ट्यावर बसून ऐकलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांचं नेतृत्त्व मुंबईसाठी आवश्यक आहे ही भावना शरद पवार यांनी राज्यभर बाळगली आहे. हे मैदान आपल्या अभिमानाचं हे मैदान आहे. शरद पवार यांनी याच मैदानावरुन पक्षाची स्थापना केली होती, असं जयंत पाटील म्हणाले.
साडे तीनशे वर्षांपूर्वी आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सूरत लुटली त्याचा राग काहींच्या मनात आजही आहे हे विसरु नका, अशा अनेक गोष्टी आहेत. कालपरवा अण्णा मलाई येऊन गेले काय बोलले,त्यांची भूमिका अशी आहे की मुंबई ही महाराष्ट्राची नाहीये. मुंबई पुन्हा तोडण्याचा डाव सुरु झालेला दिसतोय, त्यामुळं आपण सावध व्हायला पाहिजे, असं जयंत पाटील म्हणाले.