Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीमध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून अजूनही घोडं आडलं आहे. एकीकडे शिवसेना आणि काँग्रेस यांचं महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरून एकमत झाला असलं तरी अजूनही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा निर्णय झालेला नाही. दुसरीकडे महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना यांच्यामध्ये जागा वाटपावरून चांगलीच रस्सीखेच सुरू आहे. अजूनही आठ ते दहा जागांवर महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू असतानाच आता जनसुराज्य शक्ती पक्षाने सुद्धा महापालिका निवडणुकीमध्ये एन्ट्री केली आहे. 

Continues below advertisement

महानगरपालिका निवडणुकीसाठी 70 इच्छुकांच्या मुलाखती

जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक आमदार विनय कोरे यांनी कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी 70 इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. मुलाखतीसाठी येणारे उमेदवार सर्वच पक्षातील असल्याचा विनय कोरे यांचा दावा आहे. जनसुराज्य पक्ष महायुतीचा घटकपक्ष आहे. मात्र, सन्मानजनक जागा मिळाल्या तरच जनसुराज्य शक्ती पक्ष महायुतीतून लढणार असल्याचे त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता महायुतीमध्ये जागावाटपावरून आणखी तिढा वाढण्याची चिन्हे आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जागावाटपावरून असलेला तिढा अखेर सुटला आहे. शिवसेना ठाकरे गटाला कोल्हापूरमध्ये 12 जागा देण्यात येणार आहेत. यामध्ये सात जागांवर एकमत झाल्याची माहिती आमदार सतेज पाटील यांनी दिली. काल (24 डिसेंबर) कोल्हापूरमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर आणि आमदार सतेज पाटील यांनी एकत्रितपणे या संदर्भातील माहिती दिली. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबतही बोलणे सुरू असून ते सुद्धा महाविकासमध्ये असतील असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला. 

शिवसेना ठाकरे गटाला 12 जागांसह स्वीकृत नगरसेवकचा प्रस्ताव देण्यात आला आहे. हा प्रस्ताव मान्य झाला असून यामध्ये सात जागांवर एकमत झालं आहे. दुसरीकडे मनसे सुद्धा आता महाविकास आघाडीचा घटक असण्याची चिन्हे आहेत. मात्र, त्यांचा प्रस्ताव आला नसल्याचे आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सुनील मोरे यांनी मात्र मनसेचा प्रस्ताव आला होता, असं म्हटलं आहे. मात्र तो मान्य करण्याजोगा नव्हता, असे त्यांनी नमूद केलं. 

Continues below advertisement

दोन दिवसांत 536 अर्जाची विक्री 

दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून उमेदवारी अर्ज विक्री सुरू झाल्यानंतर 536 उमेदवारांनी आतापर्यंत उमेदवारी अर्ज नेले आहेत. तीन उमेदवाराकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. आज (25 डिसेंबर) ख्रिसमसनिमित्त शासकीय सुट्टी असल्याने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही. दुसरीकडे राजकीय पक्षांकडून एबी फाॅर्म उमेदवारांना अखेरच्या टप्प्यात दिले जाणार आहेत. कुठल्याही प्रकारची फाटाफूट होऊ नये, बंडखोरी होऊ नये यासाठी सर्वच पक्षांकडून सर्वच महापालिकांमध्ये काळजी घेतली जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या