Achalpur Municipal Council: राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये एमआयएमला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर राज्यामध्ये चर्चा रंगली असतानाच आता भाजपसोबत सत्तेचा सारीपाट सुद्धा मांडला आहे. निवडणुकीमध्ये एकमेकांच्या रंगांची भीती दाखवून राजकारण करणारे दोन्ही पक्ष आता थेट सत्तेसाठी मात्र एकत्र आले आहेत. अमरावती जिल्ह्यातील अचलपूर नगर परिषदेमध्ये भाजप आणि एमआयएमची चक्क युती झाली आहे. त्यामुळे या युतीची चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये चांगलीच रंगली आहे. भाजपकडून एमआयएम नगरसेवकाला शिक्षण व क्रीडा समितीचे सभापती पद देण्यात आलं आहे. एमआयएमचे 3, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 आणि तीन अपक्ष नगरसेवकांचा गट भाजपसोबत गेला आहे. त्यामुळे अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत आल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
भाजप ‘एमआयएम’मधील संबंध सर्वप्रथम अकोटमध्ये
दुसरीकडे, सत्तेसाठी वाटेल ते करण्याची तयारी राजकीय पक्षांकडून सुरू असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. राजकारण व विचारधारेचे कट्टर विरोधक मानले जाणारे भाजप आणि ‘एआयएमआयएम’चे नगरसेवक सत्ता समीकरणासाठी एकत्र आल्याचा प्रकार अकोट नगरपालिकेत उघडकीस आल्यानंतर राज्यात मोठी राजकीय खळबळ उडाली होती. त्यानंतरही संबंधित नेते भूमिका बदलण्यास तयार नसल्याचे दिसून येत असून भाजप आणि ‘एआयएमआयएम’मधील संबंध कायम असल्याचे चित्र आहे. आता या समीकरणात काँग्रेसचाही समावेश झाल्याचे पाहायला मिळाले. हिवरखेड नगरपालिकेत भाजपच्या उपसभापती पदाच्या उमेदवारासाठी काँग्रेसकडून सूचक तर ‘एआयएमआयएम’कडून नगरसेवक अनुमोदक असल्याचा प्रकार घडला आहे. आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या अकोट मतदारसंघांतर्गतच पुन्हा एकदा भाजप व ‘एआयएमआयएम’मधील संबंध चर्चेचा विषय ठरले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाचं काय झालं? असा प्रश्न आता पडला आहे.
भाजप आणि ‘एमआयएम’मधील संबंध सर्वप्रथम अकोट नगरपालिकेत समोर आले होते. भाजपच्या नेतृत्वाखाली अकोट विकास मंचाची स्थापना करताना ‘एआयएमआयएम’च्या नगरसेवकांचा त्यामध्ये समावेश करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत ‘एआयएमआयएम’ आणि काँग्रेससोबत युती नकोच, अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. यानंतर भाजपने आमदार प्रकाश भारसाकळे यांना कारणे दाखवा नोटीस बजावून पक्षाकडून खुलासा मागितला होता.
इतर महत्वाच्या बातम्या
