Kolhapur Municipal Corporation Election: कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी चित्र स्पष्ट झालं आहे. कोल्हापूरमध्ये बहुरंगी लढती निश्चित झाल्या असल्या तरी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गट विरुद्ध महायुती असा थेट महामुकाबला होणार  आहे. कोल्हापूरमध्ये अर्ज माघार घेण्याच्या अखेरच्या दिवशी 495 उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने आता रिंगणामध्ये 325 उमेदवार असणार आहेत. 820 अर्ज दाखल झाले होते, यापैकी अखेरच्या दिवशी 495 अर्ज माघार घेण्यात आले. अर्ज माघार घेण्याच्या शेवटच्या दिवशी माजी महापौर हसीना फरास, खासदार धनंजय महाडिक यांचे चिरंजीव कृष्णराज महाडिक, शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण यांचे चिरंजीव प्रसाद चव्हाण, माजी नगरसेवक राहुल चव्हाण, इंद्रजीत सलगर, धनश्री तोडकर, योगिता कोडोलीकर, माजी नगरसेविका मायादेवी भंडारे आदी प्रमुख उमेदवारांनी सुद्धा आपला अर्ज मागे घेतला. 

Continues below advertisement

इचलकरंजीत 65 जागांसाठी 230 उमेदवार रिंगणात

दरम्यान, इचलकरंजी महापालिकेमध्ये सुद्धा निवडणूक लढतीचे चित्र स्पष्ट झालं असून 65 जागांसाठी 230 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. इचलकरंजीमध्ये सुद्धा महायुती विरुद्ध महाविकास आघाडी प्रणित शिवशाहू आघाडी लढत होणार आहे. इचलकरंजीमध्ये 65 जागांसाठी महायुतीचे 79 उमेदवार रिंगणात असल्याने त्याचा फटका सुद्धा महायुतीला बसण्याची चिन्हे आहेत. काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होत आहेत. 

कोल्हापुरात काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार

दरम्यान, कोल्हापूरमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा मुकाबला होणार असला तरी शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडीमधून बाहेर पडली आहे. त्यांनी वंचित बहुजन आघाडी आणि आपशी आघाडी करत तिसरा पर्याय दिला आहे. त्यामुळे कोल्हापूरमध्ये काँग्रेस विरुद्ध आणि पर्यायाने सतेज पाटील विरुद्ध महायुती असाच सामना असेल.पाटील यांनी एकूण 81 जागांपैकी 75 जागांवर उमेदवार दिले आहेत. ठाकरेंची शिवसेना सहा जागांवर निवडणूक लढत आहे. महायुतीत भाजप 36 जागांवर निवडणूक लढवत असून शिवसेना शिंदे गट 30 जागांवर निवडणूक लढवत आहे. 15 जागा या अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आल्या आहेत. 

Continues below advertisement

65 जागा असताना महायुतीचे 79 उमेदवार रिंगणामध्ये

इचलकरंजीमध्ये मैत्रीपूर्ण लढतीच्या नावाखाली महायुतीमध्ये सावळागोंधळ असल्याचे चित्र आहे. एकूण 65 जागा असताना 79 उमेदवार रिंगणामध्ये आहेत. यामध्ये राष्ट्रवादीच्या वाट्याला दोन जागा आल्या असताना त्यांनी 10 ठिकाणी अधिकचे एबी फॉर्म दिले आहेत. भाजपकडून शिंदेंच्या वाट्याला आलेल्या जागांवरही एबी फॉर्म दिले आहेत. त्यामळे महायुती झाली असली तरी त्यांच्यामध्ये अंतर्गत लाथाळ्या असल्याची स्थिती आहे. दुसरीकडे आज इचलकरंजीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रचाराचा नारळ फोडला जाणार आहे. कोल्हापूर दौऱ्यावर भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण असणार आहेत. त्यांची सायंकाळी मिरजकर तिकटी परिसरात सभा होणार आहे. देवेंद्र फडणवीस यांचा रोडशो इचलकरंजीमध्ये असेल. त्यामुळे प्रचाराच्या पहिल्या दिवशी कोल्हापूरमध्ये महायुतीकडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला आहे. दुसरीकडे सतेज पाटील यांच्याकडून गेल्या काही दिवसांपासून नागरिकांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी करत जाहीरनाम्यासाठी विचारमंथन सुरू आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या