Kolhapur District Nanar Palika Election: कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायतींमध्ये नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाने मोठी मुसंडी मारली आहे. शिवसेना शिंदे गटाने जयसिंगपूर, शिरोळ, मुरगुड आणि कुरुंदवाड या नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षपदी विजय खेचून आणला आहे. पाठोपाठ भाजपने चंदगड हुपरी आणि आजरा या तीन ठिकाणी विजय मिळवला आहे. काँग्रेसला अवघ्या दोन ठिकाणी समाधान मानावे लागलं असून पेठवडगाव आणि शिरोळ या ठिकाणी विजय मिळवला आहे. जनसुराज्यने पन्हाळा आणि मलकापूर नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला गडहिंग्लज आणि कागलमध्ये विजय मिळाला आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये शिवसेना शिंदे गटाने बाजी मारल्याचे दिसून येत आहे.

Continues below advertisement

कोल्हापूर जिल्ह्यात महायुतीचे नगराध्यक्ष निवडणुकीत वर्चस्व

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाची मोठी पीछेहाट झाली आहे. त्यांना भोपळाही फोडता आलेला नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महायुतीने नगराध्यक्ष निवडणुकीमध्ये वर्चस्व राखल्याचे चित्र आहे. दुसरीकडे आमदार विनय कोरे यांचा जनसुराज्य पक्षही महायुतीचा घटक आहे. त्यांनी आपल्या मतदारसंघांमध्ये मलकापूर आणि पन्हाळा नगरपरिषद नगराध्यक्ष पद खेचलं आहे. 

मुश्रीफ-घाटगे आघाडीला मुरगूडमध्ये झटका

दुसरीकडे कागलच्या राजकारणामध्ये शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे एकत्र आल्याने जिल्ह्यासह राज्याच्या राजकारणामध्ये मोठी चर्चा रंगली होती. कागलमध्ये दोघाना यश मिळालं असलं, तरी मात्र मुरगुडमध्ये त्यांना दारुण पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्या गटाच्या सुहासिनी देवी पाटील यांनी नगराध्यक्षपदी विजय मिळवला. नगरपालिकेवर सत्ता सुद्धा मिळवली आहे. त्यामुळे मुश्रीफ आणि घाटगे यांना तगडा झटका बसल्याचे चित्र आहे.

Continues below advertisement

दुसरीकडे चंदगडमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचारात उतरल्याने मोठी चर्चा रंगली होती. त्या ठिकाणी भाजपचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विजयी झाला. शिरोळ नगरपालिकेमध्ये सुद्धा धक्कादायक निकालाची नोंद झाली असून आमदार अशोक माने यांच्या घराणेशाहीला मतदारांनी सपशेल नाकारलं. सूनबाई आणि मुलगा या दोघांना सुद्धा मतदारांनी घरचा रस्ता दाखवला. त्यांचा पुतण्या सुद्धा निवडणुकीमध्ये पराभूत झाला. जयसिंगपूरमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या अजित पाटील यांनी मोठा विजय मिळवला.

इतर महत्वाच्या बातम्या