Jalgaon Municipal Corporation: जळगाव महानगरपालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या 1038 उमेदवारी अर्जांची बुधवारी छाननी करण्यात आली. या प्रक्रियेत 19 प्रभागांतील एकूण 135 अर्ज बाद ठरले आहेत. एकूण 903 अर्ज वैध घोषित करण्यात आले आहेत. छाननीदरम्यान तांत्रिक त्रुटी आणि राजकीय समन्वयाच्या अभावामुळे अनेक दिग्गजांचे अर्ज बाद झाले. याचा सर्वात मोठा फटका भाजपच्या माजी महापौर जयश्री धांडे यांना बसला. त्यांच्या एबी फॉर्मवर स्वाक्षरी नसल्याने अर्ज रद्द करण्यात आला. परंतु सुदैवाने त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असल्यामुळे त्या आता भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात असतील.
भाजपने घेतलेला आक्षेप फेटाळला
शिवसेना ठाकरे गटाच्या प्रभाग क्रमांक ३ क मधील डॉ. सुषमा चौधरी आणि प्रभाग 9 मधील नितीन जाधव यांचे अर्जही एबी फॉर्मवरील आवश्यक स्वाक्षरी नसल्याने बाद ठरवण्यात आले. मात्र, ठाकरे गटाच्या उमेदवारांच्या एबी फॉर्मवरील डिजिटल स्वाक्षरीविरोधात भाजपने घेतलेला आक्षेप निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळून लावला. दरम्यान, प्रभाग 10 मधील भाजप उमेदवार जाकीर खान रसूल खान यांच्याविरोधात दाखल तक्रारही फेटाळण्यात आली. या निर्णयाविरोधात ठाकरे गटाचे उमेदवार कुलभूषण पाटील यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी प्रशासनावर मोठा ताण होता. निवडणूक कर्मचारी पहाटे 2.30 वाजेपर्यंत कार्यरत होते. सकाळी ९ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत छाननी प्रक्रिया सुरू होती.
भाजपमध्ये आयारामांना रेड कार्पेट
दुसरीकडे, भाजपने नाशिक मनपात निवडून येण्याची क्षमता तसेच निवडणूक सर्व्हेच्या नावाखाली आपल्याच पक्षाच्या अनेक माजी नगरसेवक आणि निष्ठावानांना डावलले आणि निवडणूक लढवण्याच्या उद्देशाने ऐनवेळी आलेल्यांना संधी दिली आहे. यामुळे पक्ष कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला, काहींनी पक्षांतरे केली. तरीही भाजपच्या वरिष्ठांनी आपल्या मतावर ठाम राहत तब्बल 23 आयरामांना उमेदवारी दिली आहे.नाशिक महापालिकेच्या 122 जागांसाठी 2357 उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी भाजपने सर्वाधिक 118, उमेदवार दिले असले तरी प्रभाग 14 मध्ये या पक्षाला एकही उमेदवार देता आलेला नाही. भाजपमध्ये तीस-चाळीस वर्षे काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागला. या निवडणुकीत तीन घरात दोन-दोन उमेदवारी देण्यात आली आहे. यात सुधाकर बडगुजर व त्यांचे पुत्र दीपक बडगुजर, कल्पना चुंभळे व त्यांचे दीर कैलास चुंभळे तसेच दिनकर पाटील आणि त्यांचे पुत्र अमोल पाटील अशा एकाच कुटुंबातील दोनजणांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांना धक्का बसला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या