Gokul Election: गोकुळच्या मल्टीस्टेटसाठी मला 200 कोटींची ऑफर होती, माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकरांच्या दाव्याने खळबळ, हसन मुश्रीफ, सतेज पाटील म्हणाले...
गोकुळ दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा यासाठी कोट्यवधीच्या आमिषाला ठोकर दिल्याचे जानकर यांनी म्हटल्यानंतर सतेज पाटील यांनी सुद्धा गोकुळच्या मल्टिस्टेटवरून हल्लाबोल केला आहे.

Gokul Election: माजी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी गोकुळचे मल्टिस्टेट करण्यासाठी मला तब्बल २०० कोटींची ऑफर देण्यात आली होती, असा राजकीय बॉम्ब टाकल्यानंतर गोकुळच्या भर निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा मल्टिस्टेटचा मुद्दा तापला आहे. या मुद्द्यावरून आता राजकीय रणकंदन होण्याची चिन्हे आहेत. जानकर यांनी बोलताना म्हटलं आहे की, गोकुळ दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मालकीचा राहावा यासाठी कोट्यवधीच्या आमिषाला आपण ठोकर दिली. त्यामुळे आता जानकर यांनी केलेल्या आरोपांनंतर सतेज पाटील यांनी सुद्धा गोकुळच्या मल्टिस्टेटवरून हल्लाबोल केला आहे.
दाव्यामध्ये तथ्य असेल तर महाराष्ट्राचे दुर्दैव
सतेज पाटील यांनी म्हटलं की, गोकुळ मल्टिस्टेट झाला नसल्यामुळेच आज गोकुळची निवडणूक लागली आहे. गोकुळ जर मल्टिस्टेट झाला असता तर गोकुळची निवडणूक कधी झाली हेच दूध उत्पादकांना कळालं नसतं. मात्र आम्ही त्या विरोधामध्ये लढा दिला आहे. मात्र तत्कालीन दुग्धविकास मंत्र्यांनी हा दावा करत मोठा गौप्यस्फोट केला असल्याचे ते म्हणाले. आणि या दाव्यामध्ये तथ्य असेल तर महाराष्ट्राचे दुर्दैव असल्याचेही सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. त्यांनी सांगितले की, गोकुळ हा कोणाच्या तरी घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि मुख्यमंत्र्यांचा असलेला हस्तक्षेप आता स्पष्ट होत असल्याचा आरोप सुद्धा सतेज पाटील यांनी केला. ते म्हणाले की, जर तत्कालीन दुग्धविकास मंत्री जर अशा पद्धतीने आरोप करत असतील तर त्यावरती विश्वास ठेवलाच पाहिजे आणि गोकुळवर आलेलं संकट दूर करायचं असेल तर समविचारी आघाडीसोबतच ठरावधारकांनी राहावं असं आवाहन सतेज पाटील यांनी केलं.
निवडणुकीच्या तोंडावर राळ उठवून देण्याचं काम असेल
दरम्यान, महादेव जानकर यांनी केलेल्या आरोपांनंतर हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, महादेव जानकर यांच्या वक्तव्याचा आपल्याला आश्चर्य वाटलं. इतक्या दिवसानंतर त्यांनी अशा पद्धतीने का वक्तव्य केलं हे त्यांनी अगोदर स्पष्ट करायला हवं होतं, असं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. त्यांनी जर आत्ताच वक्तव्य केलं असेल तर त्याची स्पष्टता त्यांनी द्यायला हवी, असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. निवडणुकीच्या तोंडावर राळ उठवून देण्याचं हे काम असेल, असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. एवढ्या मोठ्या दूध संघाला सरकारबरोबर संबंध ठेवावेच लागतात. संघ मोठा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी संबंध ठेवावा लागतो, असंही मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. आता पक्षीय पातळीवरती निवडणूक होणार असल्याने समन्वय साधण्याची भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली असल्याचं मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या




















