विरार : नालासोपारा विधानसभा मतदारसंघातील विवांता हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde ) यांच्याकडून पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप  बहुजन विकास आघाडीचे क्षितिज ठाकूर आणि हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) यांनी केला. विनोद तावडे अजून विवांता हॉटेलमध्ये आहेत. निवडणूक आयोगानं विनोद तावडे आणि हितेंद्र ठाकूर यांची संयुक्त पत्रकार परिषद थांबवल्याचं देखील समोर आलं आहे. यानंतर हितेंद्र ठाकूर यांनी हॉटेलबाहेर येऊन माध्यमांशी संवाद साधला. हॉटेलमध्ये काही ठिकाणी 10 लाख, 5लाख आणि 2 लाख रुपये सापडले असल्याचा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला. विनोद तावडे यांनी 48 तासांपूर्वी मतदारसंघ सोडायला हवा, होता असं हितेंद्र ठाकूर म्हणाले. 


हितेंद्र ठाकूर काय म्हणाले?


भाजपवाले सांगणार काय, सांगण्यासाठी काय आहे, पैसे वाटप, बैठक करायची असते का? असा सवाल हितेंद्र ठाकूर यांनी केला. भाजपच्या अडचणी वाढतील असं लक्षात आल्यानं पत्रकार परिषद रोखण्यात आली, असा आरोप हितेंद्र ठाकूर यांनी केला आहे. 



आचारसंहितेत पत्रकार परिषदे घेतली जात नाही, असं कुठं सांगितलं आहे, असा सवाल देखील हितेंद्र ठाकूर यांनी केला. डीसीपी मॅडमनी सांगितलं की जिल्हाधिकाऱ्यांना पत्रकार परिषद घेता येता नाही, अशी माहिती ठाकूर यांनी दिली. 


दडपण आहे का असं विचारलं असता, माझ्यावर कसलं दडपण नाही, मी कुणाला घाबरत नाही, असं ठाकूर म्हणाले. मला 50 पेक्षा अधिक फोन केले गेले मित्र आहे मिटवा, म्हणून सोडून दिले, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले.


कुठे 10 लाख, कुठे 5 लाख, कुठे  2 लाख रुपये सापडले,  निवडणूक अधिकाऱ्यांना त्याबाबत अधिक माहिती विचारा, असं हितेंद्र ठाकूर म्हणाले.  निवडणूक आयोग आणि पोलिसांवर प्रशासनाचा दबाव आहेत.48  तासापूर्वी  मतदारसंघ सोडायचा असतो, विनोद तावडे का थांबले, असा सवाल हितेंद्र ठाकूर यांनी केला. विवांता हॉटेलमधून बाहेर जात असताना विनोद तावडे, हितेंद्र ठाकूर  आणि क्षितिज  ठाकूर एकाच गाडीतून बाहेर निघाले. भाजपमधील शुभचिंतकांनी विनोद तावडे येणार असल्याची माहिती दिल्याचं ते म्हणाले. 


संजय राऊत काय म्हणाले?


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी  भाजपाने कितीही लपवायाचा प्रयत्न केला तरी त्यांचा चेहरा उघड झाला आहे, त्यांचा खेळ संपलाय, असं म्हटलं. विनोद तावडे पक्षाचे महासचिव आणि ते पैसे वाटत आहेत. भाजप आता यावर काय खुलासा करणार आहे, असा सवाल संजय राऊत यांनी केला.



इतर बातम्या :


Sanjay Raut: विनोद तावडेंना भाजपच्याच प्रमुख नेत्यानेच पकडून दिलं, हितेंद्र ठाकूरांना टीप दिली; संजय राऊतांचा गंभीर आरोप