हिंगोली : महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Assembly Election) घोषणा आज होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं आज पत्रकार परिषदेचे आयोजन केलं आहे. महाविकास आघाडी (MVA Seat Sharing) आणि महायुती यांच्यातील जागावाटपाची चर्चा अद्याप संपलेली नाही. काही ठिकाणी अजूनही मित्रपक्षांकडून काही मतदारसंघांवर दावा केला जात असल्यानं रस्सीखेच पाहायला मिळतेय. 


हिंगोली विधानसभा मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीत उमेदवारीवरून रस्सीखेच पाहायला मिळत आहे. हिंगोली विधानसभा मतदारसंघ हा आघाडीमध्ये काँग्रेसचा पारंपरिक मतदार संघ आहे. या मतदारसंघांमध्ये काँग्रेसचे भाऊ पाटील गोरेगावकर यांनी मतदारसंघाचं तब्बल तीन वेळेस नेतृत्व केलं आहे. मागील दोन विधानसभा निवडणुकीमध्ये भाऊ पाटील गोरेगावकर यांचा भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांनी पराभव केला आहे.  आता या हिंगोली विधानसभा मतदारसंघावर महाविकास आघाडी मधून ठाकरेंच्या शिवसेनेने दावा केला आहे.


वसीम देशमुख या मतदारसंघात महाविकास आघाडीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजी आणि मागील दोन विधानसभा निवडणुकीमध्ये भाऊ पाटील गोरेगावकर हे पराभूत झाल्यामुळे ही जागा शिवसेनेला द्यावी , अशी मागणी करण्यात आली आहे. 
 
काँग्रेसमध्ये ज्या पद्धतीने अंतर्गत गटबाजी आहे, तशी गटबाजी शिवसेना पक्षात नाही असं मत सुद्धा वसीम देशमुख यांनी व्यक्त केलं आहे. दुसरीकडे भाऊ पाटील गोरेगावकर हे त्यांच्या उमेदवारीवर ठाम आहेत कारण हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे. मी पराभूत झालो असलो तरी विजयी झालेल्या निवडणुकीपेक्षा पराभूत झालेल्या निवडणुकीत मला जास्त मतदान पडलं आहे.


लोकसभा निवडणुकीत हिंगोली विधानसभा मतदारसंघांमध्ये मोठ्या प्रमाणात लीड देण्याचे काम मी केलं आहे. त्यामुळे मला तेव्हाच उद्धव ठाकरे यांनी वाऱ्यावर सोडले जाणार नाही हा शब्द दिला होता, अशी प्रतिक्रिया माजी आमदार भाऊ पाटील गोरेगावकर यांनी दिली आहे.


मविआचं जागा वाटप उद्या जाहीर होणार? 


केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा आज केल्यानंतर मविआतील जागा वाटपाच्या चर्चांना वेग येण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी जागा वाटपासंदर्भात अंतिम निर्णय घेऊन उद्याच घोषणा करणार असल्याची माहिती दिल्लीतील राजकीय वर्तुळात आहे. 


दरम्यान, आज दुपारी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा आज दुपारी साडे तीन वाजता होणार आहे. त्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू होईल. 


इतर बातम्या : 


Mahayuti : एकनाथ शिंदेंकडून विधानसभेचा पहिला उमेदवार जाहीर, भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर, राजीनाम्याचा इशारा


Maharashtra Election Dates : मोठी बातमी! महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार, दुपारी 3.30 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद