नवी दिल्ली: दिल्लीत सध्या काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या महत्वाच्या नेत्यांचा मुक्काम पक्ष मुख्यालयातच आहे ,असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. कारण, दोन्ही पक्षांमध्ये मॅरेथॉन बैठकांचं सत्र सुरू आहे. कारण आहे अर्थातच महाराष्ट्रातील जागावाटप आणि उमेदवारांची यादी निश्चित करणं. पितृपक्ष संपत आल्यानं उमेदवारी जाहीर करणं, नाराजांची समजूत काढणं व पुढे प्रचार यामुळे आता या पक्षांच्या हाती कमी वेळ उरला आहे.
भाजपच्या मुख्यालयात दुपारी साडेबारा वाजल्यापासून बैठक सुरू आहे. ही बैठक रात्री ११ पर्यंत चालण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्याही आज एकापाठोपाठ एक बैठका झाल्या. सकाळी 11 ते ३ अशी जवळपास चार तास स्क्रिनिंग कमिटीची बैठक झाली. त्यानंतर, चार वाजता केंद्रीय निवडणूक समितीची सुरू झालेली बैठक अद्यापही सुरू आहे. केंद्रीय निवडणूक समितीच्या या बैठकीनंतर पुन्हा स्क्रिनिंग कमिटीची बैठक होईल. स्क्रिनिंग कमिटीची काँग्रेसची आजची ही शेवटची बैठक असेल. त्यानंतर, पुन्हा केंद्रीय निवडणूक समितीची आणखी एक बैठक होऊ शकते. पण, त्या बैठकीला राज्यातले कोणीही असणार नाहीत. तिथे, भाजपच्या आजच्या कोर कमिटीच्या बैठकीनंतर रविवारी भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक मोदींच्या उपस्थितीत होणार आहे. भाजपचा निवडणुकीचा विषय या दोन बैठकीतच संपतो.
काँग्रेसने आतापर्यंत 105 जागा निश्चित केल्या आहेत. भाजपची तयारी पूर्ण असली तरी सेनेबरोबरच्या युतीच्या औपचारिक घोषणेनंतर त्यांचे निर्णय समोर येतील. अर्थात, दोन्ही पक्ष आपली यादी पितृपक्षानंतरच जाहीर करणार आहेत.
काँग्रेस, भाजपच्या उमेदवार निवडीसाठी दिल्लीत मॅरेथॉन बैठका, पितृपक्षानंतर होणार याद्या जाहीर
एबीपी माझा वेब टीम Updated at: 26 Sep 2019 09:03 PM (IST)