इंदापूर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला अजून एक मोठा धक्का बसणार आहे. आणि त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कारण ठरण्याची शक्यता आहे. कारण, माजी संसदीय कामकाजमंत्री आणि काँग्रेसमधील मोठं नाव इंदापूरचे हर्षवर्धन पाटील लवकरच काँग्रेसला रामराम ठोकण्याची शक्यता आहे. इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होती. त्यावेळी त्यांनी भाजप प्रवेशाचे संकेत देताना राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केलीय. इंदापूर विधानसभेची जागा सोडायला राष्ट्रवादी काँग्रेस तयार नाही. त्यामुळे पाटील लवकरच भाजपवासी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, येत्या १० तारखेला आपण निर्णय जाहीर करु, अशी घोषणा पाटील यांनी केलीय. यावेळी पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक करायलाही विसरले नाहीत.


यावेळी पाटील म्हणाले की, आज मी सगळं बोलणार आहे. आता आपल्यावर कोणाचं बंधनं नाही. आमच्यावर सभ्यतेचे संस्कार आहेत पण राष्ट्रवादी काँग्रेसने त्याचा गैरफायदा घेतला. एक नाही तर पाच लोकसभा निवडणुकीत त्यांचं काम केलं. पण आम्हाला काय मिळालं, असा सवाल त्यांनी केला.  राष्ट्रवादी काँग्रेसची शिवस्वराज्य यात्रा निघाली तेव्हा इंदापूरमधे येणार नव्हती. पण मग अचानक कशी आली. वाघ म्हटलो तरी खातंय आणि वाघोबा म्हटलं तरी खातंय, असे म्हणत त्यांनी पवारांना आव्हान दिले.

पाटील म्हणाले की, बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख केला पाहिजे. ते शब्दाचे पक्के होते. 1995 ला अपक्ष निवडून आल्यानंतर भाऊ मला बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे घेऊन गेले आणि बाळासाहेबांना म्हणाले हा माझा पुतण्या तुमच्या हवाली करतो आणि त्यांनी मला मंत्री केलं. गोपीनाथ मुंडेंची पण आज आठवण येते. 1999 ला कॉंग्रेसचे सरकार आले. त्यावेळी गोपीनाथ मुंडे मला हाताला धरून विलासराव देशमुखांकडून घेऊन गेले आणि म्हणाले याला मंत्री करा. विलासराव देखील शब्दाला पक्के होते. त्यांनी देखील मला मंत्री केलं, असेही ते म्हणाले.

2004 ला पुन्हा कॉंग्रेसनं तिकीट नाकारल्याने अपक्ष उभं रहावं लागलं.  2009 ला कॉंग्रेसनं तिकीट दिलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यानं माझ्या विरोधात बंडखोरी केली.   शरद पवारांनी माझ्यासाठी प्रचार केला पण दुसऱ्या पवारांनी विरोधात काम केलं. आताच्या लोकसभा निवडणुकीत देखील माझ्या कार्यकर्त्यांची सुप्रिया सुळेंचा प्रचार करण्याची इच्छा नव्हती. पण आम्ही प्रचार केला. पुण्यातील माझ्याच घरी कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची बैठक झाली. त्या बैठकीला अजित पवार होते. त्यावेळी त्यांना विचारलं तर म्हणाले राहुल गांधी आणि शरद पवार ठरवतील तसं होईल. लोकसभा निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी पुण्यात आले होते. सकाळी सात वाजता त्यांनी मला भेटायला बोलवलं. मी पोहोचलो तर माझ्या आधी साडे सहाला सुप्रिया सुळे त्यांना भेटायला आल्या होत्या. राहुल गांधींनी माझ्यासमोर त्यांना सांगितलं की, लोकसभेला हर्षवर्धन पाटील तुमचं काम करतील पण विधानसभेला तुम्हाला त्यांचं काम करावं लागेल. आणखी काय पुरावा पाहिजे, असेही पाटील यावेळी म्हणाले.

गेली पाच वर्ष सत्तेत नव्हतो. पण मंत्रालयात गेल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली कामं केली ‌. लोकसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपकडून उभा राहण्याची ऑफर दिली होती. आपणं ती नाकारली. पण तरीही त्यांनी राग धरला नाही, अशा शब्दात त्यांनी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं.

आमच्याकडं जनतेचं बळ आहे . त्यामुळं आम्ही हतबल होणार नाही.  आता अन्याय सहन करायचा नाही.  विधानसभा निवडणुकीला अजुन काही दिवसांचा वेळ आहे. त्यामुळं आपल्या मनातील ज्या भावना आहेत त्याच माझ्या आहेत. या महिन्याच्या दहा तारखेला आपण निर्णय जाहीर करु. वरच्या लोकांशी बोलणी सुरू आहेत, असे पाटील यांनी यावेळी म्हणाले.

कोण आहेत हर्षवर्धन पाटील 

हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचे बडे नेते आहेत. काँग्रेसच्या मुख्यमंत्रीच्या पदाच्या शर्यतीत त्यांचे नाव अनेक वेळा आले होते. असे असूनही पक्ष त्यांचा विचार मात्र सध्या करत नसल्याचे त्यांच्या कार्यकर्ते म्हणणे आहे. मागील लोकसभा निवडणुकीत बारामतीत मतदार संघात सुप्रिया सुळे यांना पाटील यांनी मदत केली होती. स्वतः अजित पवार व सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्या पुण्याच्या निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांची मनमानी केली होती. शरद पवार यांनीही पाटील यांच्याशी चर्चा केली होती. यात पवार यशस्वी झाले होते. लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना इंदापूर तालुक्यातील 70 हजारांचे मताधिक्य मिळाले. यात राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर काँग्रेसचाही मोठा वाटा होता.

दरम्यान शरद पवार यांनी हर्षवर्धन पाटील यांना इंदापूर तालुक्याच्या विधानसभेची उमेदवारी देणाच्या शब्द दिल्याची चर्चा होती. मात्र सध्या राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूरची जागा सोडण्यास तयार नाही. त्यामुळे नाराज झालेले पाटील हे भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. 2014 चा अपवाद वगळता 1952 सालापासून इंदापूर तालुक्यावर काँग्रेसची सत्ता ठेवण्यात हर्षवर्धन पाटील व पाटील घराणे सत्ता टिकवून ठेवण्यात यशस्वी ठरले आहे.