Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis: भिवंडी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीचा (Bhiwandi Mahanagarpalika Election 2026) प्रचार शिगेला पोहचला आहे. या निवडणुकीत सर्वाधिक 58 उमेदवार काँग्रेस पक्षाने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. त्यात भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी समाजवादी पक्षाविरोधात काँग्रेस पक्षाला साथ दिली आहे. भिवंडी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी शांतीनगर के. जी. एन. चौकात शनिवारी रात्री जाहीर सभा घेतली. या सभेत त्यांनी भाजपसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय. बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी तुषार आपटेला भाजपने स्वीकृत नगरसेवकपद दिले होते. यावरून भाजपवर टीकेची झोड उठल्यानंतर तुषार आपटेने आपल्या पदाचा राजीनामा दिला. या प्रकरणाचा दाखला देत हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर निशाणा साधलाय.  

हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपचा उल्लेख बलात्कारी जनता पार्टी असा त्यांनी केला. बलात्कार करणाऱ्यांना त्यांच्या पक्षात सन्मान दिला जातो. बदलापूर येथील शाळेतील अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार करण्याच्या प्रकरणात शाळेचे सचिव तुषार आपटे यांच्यावर गुन्हा दाखल असताना भाजप त्यांना स्वीकृत नगरसेवकपदी नियुक्त करून सन्मान करते, असा घणाघात त्यांनी केला.

Harshvardhan Sapkal on Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीस यांचा दरींदा म्हणून उल्लेख 

बलात्कार करा, तुमची इज्जत वाढेल. आपल्या शहरातील, राज्यातील मुलींचे, महिलांचे रक्षण होण्याची गरज आहे, असे सांगत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर तोफ डागली. देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख दरींदा असा केला. ज्याचा अर्थ क्रूर असा होता. राज्यात धर्माधर्मात, जातीजातीत भांडण लावण्याचे काम ते करीत आहेत. त्यांनी संविधान, संस्कृतीची हत्या करायला सुरुवात केली आहे. दरींदा ही कोणती शिवी नाही ते क्रूर असल्याने त्यांचा उल्लेख तसा करावा लागतो, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले.  

Harshvardhan Sapkal: दुसऱ्या पक्षांना ओहोटी लागली

दरम्यान, भिवंडी पूर्व विधानसभा क्षेत्रात समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख यांनी काँग्रेसच्या उमेदवारांना एबी फॉर्म वितरित केले. याबाबत विचारले असता भिवंडी हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला होता आणि आहे. पक्षाकडे अनेकांनी उमेदवारी मागितली होती. नंतर प्रक्रिया करून जी नावे अंतिम झाली, त्यांना उमेदवारी देण्यात आली. दुसऱ्या पक्षांना ओहोटी लागल्याने काँग्रेसकडे ओढा वाढत आहे. त्यामुळे पक्षावर आरोप होत आहेत, असे सांगत पक्षाला अनेक अदृश्य हात मदत करीत आहेत, असल्याचे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. 

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

मोठी बातमी! अखेर बदलापूर बाल लैंगिक अत्याचारातील आरोपी तुषार आपटेचा राजीनामा; भाजपची पुन्हा नाचक्की