Gulabrao Patil: महापालिका निवडणुकीसाठी (Mahapalika Election) 15 जानेवारीला मतदान होणार तर 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असून प्रचार सभांना सुरुवात झाली आहे. मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी जळगावच्या धरणगाव येथील प्रचार सभेत तुफान फटकेबाजी केली आहे. तसेच, गुलाबराव पाटलांनी आमदार किशोर पाटील यांना थेट सल्ला देत, “विरोधकांना काहीही बोलू नका. आपण निवडून आलो आहोत, म्हणजे आता आपण सर्वांचे आहोत,” असे स्पष्ट शब्दांत सांगितले.
गुलाबराव पाटील म्हणाले, “विरोधक जरी आपल्याकडे आले, तरी त्यांना पाणी पाजा. आपली लोकशाही आहे. लोकशाहीत निवडणूक संपली की सर्व विरोध संपले पाहिजेत.” त्यांनी हेही स्पष्ट केले की आमदारकीची निवडणूक अजून खूप लांब आहे. सध्या पुढे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत आणि त्यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे, असे देखील त्यांनी म्हटले. गुलाबराव पाटील पुढे म्हणाले की, “किशोर पाटील, तुम्ही तुमच्या मतदारसंघात भाजपसोबत युती करणार नाही, हे मला माहीत आहे". यामागे मागील अनुभवांचा दाखला देत त्यांनी सांगितले की, नगरपरिषद निवडणुकीत शिवसेनेचे आमदार किशोर पाटील यांनी भाजपशी युती तोडून स्वतंत्र निवडणूक लढवली होती. पाचोरा आणि भडगाव या दोन्ही ठिकाणी शिवसेना आणि भाजप यांच्यात थेट सामना झाला आणि भाजपला पराभूत करत शिवसेनेने दोन्ही ठिकाणी सत्ता मिळवली. त्यामुळे आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्येही भाजपशी युती होणार नाही, असे संकेत गुलाबराव पाटलांनी दिले.
Gulabrao Patil: मला सर्वांसोबत आय लव यू करावं लागतं
आपली स्वतःची भूमिका स्पष्ट करताना गुलाबराव पाटील म्हणाले, “मला बोलता येत नाही, मला प्रॉब्लेम आहे. मी सरकारमध्ये आहे.” यावरून सत्तेत असताना शब्द जपून वापरावे लागतात, असे सांगत त्यांनी मिश्कील शैलीत, “मला सर्वांसोबत ‘आय लव्ह यू’ करावं लागतं, जबाबदारी सांभाळून बोलावं लागतं,” असेही म्हटले. मात्र, किशोर पाटील यांना बोलण्याची सूट असल्याने “ते दंड थोपटत आहेत,” असेही त्यांनी हसत-खेळत सांगितले. किशोर पाटील यांच्या राजकीय प्रवासावर भाष्य करताना गुलाबराव पाटील म्हणाले, “किशोर पाटील पूर्वी पोलिसात होते. कधीकाळी ते आमदाराच्या मागे पिस्तूल घेऊन उभे राहिले असते, पण नशिबाने तेही आमदार झाले.”
Gulabrao Patil: माझ्याकडे धरणगावची 25 वर्षे सत्ता होती
धरणगावच्या राजकारणाचा संदर्भ देत गुलाबराव पाटील म्हणाले, “धरणगावची सत्ता माझ्याकडे 25 वर्षे होती, ती गेली आहे. पण ती परत येणार नाही असे नाही. ती सत्ता पुन्हा माझ्याकडे येईल.” निवडून आल्यानंतर काही नगरसेवकांचे वर्तन कसे बदलते, यावरही त्यांनी खंत व्यक्त केली. “निवडून आल्यानंतर दोन मोबाईल, चार माणसं आणि हवा लागते,” असे म्हणत त्यांनी नगरसेवकांना कानपिचक्या दिल्या.
Gulabrao Patil: गुलाबराव पाटलांचे भावी नगरसेवकांना आवाहन
नगरसेवकांना उद्देशून गुलाबराव पाटील यांनी कळकळीचे आवाहन केले. “हात जोडून सांगतो, आलेल्याशी गोड बोला. काम होवो अथवा न होवो, पण भाषा गोड ठेवा.” काही नगरसेवक निवडून दिलेल्यालाच नंतर पाहत नाहीत, अशी टीकाही त्यांनी केली. “जे डोक्यावर घेतात, त्यांनाच नंतर डोक्याखाली पटकतात,” असा टोला त्यांनी लगावला.
Gulabrao Patil: पैसे नव्हते म्हणून नगरसेवकांना घेऊन पळून गेलो होतो
आपल्या जुन्या राजकीय संघर्षांच्या आठवणी सांगताना गुलाबराव पाटील म्हणाले, “1996 मध्ये मी धरणगावचा पहिला नगराध्यक्ष बसवला होता. पैसे नव्हते म्हणून नगरसेवकांना घेऊन झुरखेड्याला पळून गेलो होतो.” त्या काळात एका श्रीमंत कार्यकर्त्याच्या राजवाड्यात तब्बल 16 दिवस नगरसेवकांना ठेवून नंतर धरणगावचा नगराध्यक्ष बसवला, असा किस्सा त्यांनी यावेळी सांगितला.
राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ
आणखी वाचा