सुरत : काँग्रेस अध्यक्ष अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'मोदी' आडनावावरून केलेलं  वक्तव्य महागात पडण्याची चिन्हे आहेत. गुरुवारी सुरतच्या कोर्टाने राहुल गांधींना समन्स जारी केला आहे.  'सगळ्या चोरांची नावे मोदी कशी असतात?' असं वक्तव्य राहुल गांधी यांनी केलं होतं. या वक्तव्याविरोधात गुजरातच्या एका आमदाराने राहुल गांधींच्या विरोधात मानहानीचा खटला दाखल केला आहे.


एका प्रचारसभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर निशाणा साधताना सर्वच चोरांची आडनावे 'मोदी' का आहेत, असा सवाल केला होता. यावेळी नीरव मोदी आणि ललित मोदी यांचा उल्लेख राहुल यांनी केला होता.

सुरत जिल्हा न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश बी. एच. कपाडिया यांनी राहुल गांधीयांना समन्स जारी करत 7 जून रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीच्या कायद्याअंतर्गत तक्रार केली आहे. या तक्रारीत 'सर्व मोदी चोर आहेत' असं म्हणून राहुल गांधींनी सर्व मोदी समुदायाचा अपमान केला आहे, असा दावा पूर्णेश मोदी यांनी केला आहे.

दरम्यान, बिहारचे भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी देखील याआधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'सारे मोदी चोर हैं' या वक्तव्याच्या विरोधात मानहानीचा दावा ठोकला होता.

राहुल गांधी यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे ज्यांची आडनावे मोदी आहेत त्या सर्वांनाच 'चोर' असे संबोधले गेले आहे. या वक्तव्यामुळे समाजातील मोदी नावाच्या व्यक्तींची प्रतिमा मलीन झाली असल्याचे सुशील मोदी यांनी म्हटलं होतं.