Gopal Shetty: विधानसभेच्या धामधुमीत आता बोरिवली विधानसभा मतदारसंघामध्ये मोठा ट्विस्ट आला आहे. या मतदारसंघात बंड थंड करण्यासाठी पक्षाकडून मोठे प्रयत्न सुरू आहेत. अशातच बोरिवली विधानसभा मतदारसंघातून गोपाळ शेट्टी यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज भरला आहे. बोरिवली  विधानसभा मतदारसंघातून गोपाळशेट्टी भाजपकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. मात्र, त्या ठिकाणी संजय उपाध्ये यांना भाजपकडून तिकीट देण्यात आले आणि त्यामुळेच गोपाळ शेट्टी मागील काही दिवसांपासून नाराज होते. त्यांनी अपक्ष म्हणून जेव्हा अर्ज भरला तेव्हा अर्ज मागे घेण्यात यावा अशा प्रकारची विनंती भाजपकडून करण्यात आली आहे, त्याबाबत त्यांची मनधरणी केली जात आहेत.


भेटीनंतर काय म्हणाले गोपाळ शेट्टी?


मात्र, गोपाळ शेट्टी हे अर्ज मागे घेण्यास तयार नाहीत ते निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. त्यामुळे त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न  भाजप नेत्यांकडून केले जात आहेत. भाजप नेते आशिष शेलार, विनोद तावडे यांनी गोपाळ शेट्टी यांची भेट घेऊन समजूत काढण्याचा प्रयत्न केला. आता विनोद तावडे हे गोपाल शेट्टी यांना फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर घेऊन गेले. त्यांच्यामध्ये तब्बल तासभर चर्चा झाल्याची माहिती आहे. 


भेटीनंतर माध्यमांशी बोलताना गोपाळ शेट्टी म्हणाले, मी कुठल्याही परिस्थिती पक्ष सोडणार नाही, पक्षाने काढण्याचा निर्णय घेतला तरी मी पक्ष सोडणार नाही. मी जे काही काम करतो ते पक्ष हितासाठी करत आहे. पक्षाला पक्षाचे काम करावं लागतं, पण मी सांगितलं आहे की मी पक्ष सोडणार नाही. पक्षात असे काही लोक आहेत जे पक्षाला हानी पोहोचवतात त्यांच्याशी माझी लढाई आहे हे मी पहिल्या दिवसापासून बोलत आहे. माझं पाऊल पुढे पडत असेल ते पक्ष हितासाठीच असेल, मी माझ्या उमेदवारीवर ठाम आहे. गोपाळ शेट्टी यांच्या हृदयात आणि डोक्यात कमळ आहे असं शेट्टींनी म्हटलं आहे. 


बंडखोरी का?


नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये पियुष गोयल यांना उमेदवारी मिळण्यासाठी पत्ता कट केलेल्या गोपाळ शेट्टी यांना पुढच्या निवडणुकीला तिकीट देण्याबाबातचा शब्द देण्यात आला होता. मात्र विधानसभेला तिकीट मिळण्याच्या आशेवर असलेल्या शेट्टींना डावलूनमुंबई भाजप सरचिटणीस संजय उपाध्याय यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल करण्याचं ठरवलं आहे. त्यानंतर आता त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न पक्षाकडून सुरू आहे, मात्र शेट्टी आपल्या निर्णयावर ठाम आहेत.